बिहार निवडणूक लढण्यामागे चिराग पासवान यांची मोठी खेळी, CM पदाची तयारी की NDA मध्ये नव्या संघर्षाची नांदी?
बिहारचं राजाकरण आतापासूनच तापू लागलं आहे. लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची तयारी दर्शवली आहे. “पक्षने सांगितलं तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे,” असं म्हणत त्यांनी एक नवा राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत. त्यांनी थेट निवडणुकीत उतरावं अशी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचीही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत मोठ्या अटीतटीच्या लढती पहायला मिळणार आहेत.
चिराग कोणत्याही आरक्षित जागेवरून नाही, तर सामान्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. केवळ दलित किंवा मागासवर्गीय नेते म्हणून नव्हे, तर संपूर्ण बिहारचे नेतृत्व करणारा नेता म्हणून छाप निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
चिराग तीन वेळा खासदार राहिले असून सध्या केंद्रात मंत्री देखील आहेत. असे असताना ते आता थेट विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा विचार का करत आहेत, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. चिराग यांना असं वाटतं की “बिहारची राजकारण दिल्लीमध्ये बसून चालत नाही.” त्यामुळे प्रत्यक्ष मैदानात उतरणं ही फक्त व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा नसून एनडीएच्या व्यापक रणनीतीचा भाग आहे. 8 जूनला चिराग आऱामध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करत आहेत. यामार्फत ते सर्वसमावेशक नेते म्हणून स्वत:ची प्रतिमा स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत.
एनडीएमध्ये सध्या मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार आहेत, तर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी भाजपकडे आहे. अशात चिराग जर विधानसभा निवडणूक जिंकले, तर एनडीएच्या सत्तासंरचनेत त्यांची भूमिका काय असेल, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरजेडीसारख्या विरोधकांनी यावर टीका करत चिराग यांचे विधानसभा प्रवेश हे एनडीएतील अंतर्गत संघर्षाचे लक्षण असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणतात, “एकाच घरात आता अनेक मुख्यमंत्री दावेदार झालेत.”
Parbhani Political News: बड्या नेत्याचा पुन्हा युटर्न; शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांकडे जाणार
चिराग यांचा हा राजकीय डाव निवडणूक जिंकण्यापुरता मर्यादित नाही. त्यांचं अंतिम लक्ष्य हे बिहारच्या सत्ताकेंद्रात एक महत्त्वाची धुरी बनण्याचं आहे. चिराग हे नितीश कुमार यांचे संभाव्य उत्तराधिकारी असतील का, की एनडीएच्या नव्या नेतृत्वाचे केंद्रबिंदू, यावर भविष्यातील राजकारण ठरणार आहे.या पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांचं विधानसभेच्या दिशेनं झुकणं, हे बिहारच्या सत्तासमीकरणात मोठा बदल घडवू शकतं. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका केवळ राजकीय पक्षांमध्येच नव्हे, तर नेतृत्वाच्या नव्या दावेदारांमध्येही संघर्षाचं कारण ठरणार आहेत.