माजी नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Parbhani Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर सर्वानुमते ठरलं! अशी पोस्ट करत बाबाजानी दुर्राणी यांनी आठ जुनला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाथरी विधानसभा मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपापली मते मांडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि राजकीय घडामोडींच्या दृष्टीने चर्चा कऱण्यात आली. यानंतर राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा आणि शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी स्पष्ट केले. बाबाजानी यांच्या पक्षाला रामराम करण्यामुळे राज्यात शरद पवारांच्या नेतृत्वाखालील गटातील अनेक शिलेदार आता अजित पवारांच्या गटात सामील होत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होती. त्यावेळी सुरूवातीपासून ते अजित पवार यांच्यासोबत पक्षाची भूमिका मांडत राहिले. पण लोकसभ निडणुकीच्या वेळी बाबाजानी यांनी पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला लोकशभा निवडणुका झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने त्यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. पण महाविकास आघाडीत पाथरी विधानसभेची जागा काँग्रेसचे आमदार सुरेश परपुडकर यांच्याकडे गेली. त्यामुळे बाबाजानी दुर्राणी यांनी नाराजीतून पाथरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
येत्या ८ जून रोजी पाथरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत. या वेळी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि त्यांचे सर्व समर्थक अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दुर्राणी यांच्या या निर्णयामुळे शरद पवारांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्यात दुर्राणी यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या काळात पक्षाची घवघवीत वाढ झाली होती. दुर्राणी यांच्या प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात अजित पवारांच्या गटाचे बळ अधिकच वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक चेहऱ्यासाी एक म्हणून ओळखले जातात. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून त्यांनी शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहून पक्षासाठी काम केले. पाथरी नगरपरिषदेच्या सदस्यापासून दुर्राणी यांनी आपली राजकीय कारकीर्द केली. त्यानंतर ते पाथरी नगरपरिषदेचे अध्यक्ष झाले आणि वक्त बोर्डाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
2004 मध्ये झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. त्यानंतर 2012 मध्ये परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते पुन्हा विधान परिषद सदस्यपदी म्हणून निवडून गेले. 2018 मध्ये त्यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली. 2024 मध्ये त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दुर्राणी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून पाथरी मतदारसंघातून निवडणूक लढवली; मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.