मनसेचे वैभव खेडेकर यांनी फेसबुक पोस्ट करत पक्षाबाबत व्यक्त केली जाहीर नाराजी
MNS Politics: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खंदे समर्थक, राज ठाकरे यांचे विश्वासू नेते वसंत मोरे यांनी गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. स्थानिक पातळीवरून होणारा विरोध आणि डावलले जात असल्याची भावना या सगळ्यातून वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. वसंत मोरे यांच्यानंतर आता मनसेचा आणखी एक नेता नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे संबंधित नेत्याने त्याची नाराजी जाहीरपणे व्यक्तही केली आहे.
राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगापासून राज्यातील प्रत्येक लहान मोठ्या पक्षाने या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. राजकीय सोयीचा विचार करून अनेक नेते आता पक्षांतर करून लागले आहेत. या सगळ्यात मनसेच्या गोटातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर नाराज असल्याच्या चर्चां सुरू आहेत. विशेष म्हणजे त्यांनी थेट फेसबुकवर पोस्ट शेअर करत आपली नाराजीही व्यक्त केली आहे. “निष्ठावंतांना पक्षात कवडीचीही किंमत नसते,”असे लिहीत त्यांनी एकप्रकारे आपली नाराजीच जाहीर केली आहे.
काही दिवसांपूर्वी खेड येथे एका मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मनसेचे वैभव खेडेकर, शिंदे गटाचे रामदास कदम आणि राज्याचे मंत्री उदय सामंत हे तिघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी, “हे व्यासपीठ असंच एकत्र राहावं,” अशी सूचक टिप्पणी केली. त्याचवेळी रामदास कदम यांनी, “खेडेकर यांचा राजकीय गुरू मीच आहे,” असे वक्तव्य करत आपले वजन दाखवले. या दोन्ही वक्तव्यांनंतर वैभव खेडेकर यांनी फेसबुकवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. “पक्षात निष्ठावंतांना कवडीचीही किंमत नसते,” अशा शब्दांत त्यांनी आपली खदखद मांडली.
खेडेकर यांच्या फेसबुक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ते पक्षावर नाराज आहेत का? नाराज असतील तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काय निर्णय घेणार? त्यांच्या मनात पक्ष बदलण्याचा विचार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, मनसेकडून अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. खेडेकर खरोखरच नाराज असतील, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांची नाराजी कशी दूर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वैभव खेडेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य सरचिटणीस असून, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. ते मनसेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून ओळखले जातात. त्यांनी पक्षाच्या कोकणातील कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. खेडेकर हे मनसेच्या आक्रमक कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या मुद्द्यावर आंदोलन केल्यामुळे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या धमक्यांबाबत त्यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेवरुन अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, सर्वांना…
एप्रिल 2022 मध्ये, खेडेकर यांना नगरविकास मंत्रालयाने सहा वर्षांसाठी अपात्र ठरवले होते. त्यांच्यावर नगराध्यक्ष पदाचा गैरवापर केल्याचे आरोप होते, ज्यात नियमबाह्य पद्धतीने देयके प्रदान करणे, मान्यता नसतानाही खासगी वाहनात सरकारी खर्चाने इंधन भरणे, इतिवृत्तांत बदल करणे इत्यादींचा समावेश होता. या निर्णयामुळे खेड शहरात मनसे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष उफाळून आला होता.
सध्या, खेडेकर पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे चर्चेत आहेत. रत्नागिरीतील एका कार्यक्रमात, शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिंदे गटात सामील होण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. खेडेकर हे मनसेचे सक्रिय आणि आक्रमक नेते असून, कोकणातील राजकारणात त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.