'ब्राह्मोसची ताकद पाहिलीय का? नसेल तर पाकड्यांना विचारा'; CM योगी कडाडले
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र उत्पादन युनिटचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या युनिटमध्ये दरवर्षी ८० ते १०० क्षेपणास्त्रं बनवण्याचं उद्दिष्ट आहे.
या प्रसंगी मुख्यमंत्री योगी म्हणाले की, दहशतवाद हा कुत्र्याचा शेपूट आहे, जो कधीही सरळ होणार नाही. त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल. आम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी दोनशे एकर जमीन दिली. आता इथे ब्रह्मोस बनवण्यास सुरुवात होईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद पाहिली असेल, जर तुम्ही ती पाहिली नसेल, तर पाकिस्तानच्या लोकांना विचारा की ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?. पंतप्रधानांनी घोषणा केली आहे की कोणत्याही दहशतवादी घटनेला आता युद्ध मानले जाईल आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण दहशतवाद पूर्णपणे नष्ट करत नाही तोपर्यंत समस्या सुटणार नाही. आता ती चिरडून टाकण्याची वेळ आली आहे, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकत्रितपणे मोहिमेत सामील व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं.
ते पुढे म्हणाले की, प्रेमाच्या भाषेवर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यासाठी तयार राहावे लागेल. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे जगाला संदेश दिला आहे. लखनौमध्ये सुरू झालेल्या एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीमधून दरवर्षी ८० ते १०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तयार केली जातील. याशिवाय, दरवर्षी १०० ते १५० नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोस क्षेपणास्त्रे देखील तयार केली जातील. ही क्षेपणास्त्रे एका वर्षात तयार केली जाणार आहेत.
आतापर्यंत सुखोईसारखे लढाऊ विमान फक्त एक ब्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकत होते, परंतु आता तीन नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोस क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम असतील. नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोस क्षेपणास्त्राची श्रेणी ३०० किलोमीटरपेक्षा जास्त असेल आणि त्याचे वजन १,२९० किलोग्रॅम असेल, तर सध्याच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे वजन २,९०० किलोग्रॅम आहे.
लखनौमध्ये ३०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या उत्पादन युनिटमध्ये २९० ते ४०० किमी रेंज आणि २.८ मॅकचा कमाल वेग असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जाईल. ब्रह्मोस भारत आणि रशिया यांचा संयुक्त उपक्रम आहे. हे क्षेपणास्त्र जमीन, समुद्र किंवा हवेतून प्रक्षेपित केले जाऊ शकते. ते ‘फायर अँड फॉरगेट’ मार्गदर्शन प्रणालीचे अनुसरण करते.
२०१८ च्या ग्लोबल इन्व्हेस्टर समिट दरम्यान संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर उपक्रमाचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादन युनिटची घोषणा केली होती. त्यानंतर, २०२१ मध्ये त्याची पायाभरणी करण्यात आली. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे भारताच्या डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओ मशीनोस्ट्रोयेनिया यांनी संयुक्तपणे विकसित केली आहेत आणि ती भारताच्या संरक्षण प्रणालीसाठी महत्त्वाची मानली जातात.
Indian Army DGMO: कोण आहेत भारतीय लष्कराचे DGMO; किती मिळतो पगार?
याच कार्यक्रमात, टायटॅनियम आणि सुपर अलॉयज मटेरियल प्लांट (स्ट्रॅटेजिक मटेरियल टेक्नॉलॉजी कॉम्प्लेक्स) चे देखील उद्घाटन करण्यात आले. यामध्ये एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे उत्पादन करेल. याशिवाय, संरक्षण चाचणी पायाभूत सुविधा प्रणाली (डीटीआयएस) ची पायाभरणी करण्यात आली. संरक्षण उत्पादनांच्या चाचणी आणि प्रमाणनासाठी डीटीआयएसचा वापर केला जाईल. उत्तर प्रदेश सरकारने मोफत दिलेल्या ८० हेक्टर जमिनीवर बांधलेले ब्रह्मोस उत्पादन युनिट साडेतीन वर्षांत पूर्ण करण्यात आले.
यूपी डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये लखनौ, कानपूर, अलीगढ, आग्रा, झाशी आणि चित्रकूटसह सहा नोड्स आहेत. युनिटचं मुख्य उद्दिष्ट मोठ्या संरक्षण गुंतवणुकीला आकर्षित करणे आहे. तामिळनाडूनंतर असा कॉरिडॉर उभारणारे उत्तर प्रदेश हे दुसरे राज्य आहे.