
Abhijit Dipke, Sonam Wangchuk, Paper Leak Protest
Cockroach Janta Party Protest: देशाचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या अनिश्चितकालीन उपोषणाचा आज विसावा दिवस आहे. तर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज 27 वा दिवस आहे. सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके यांनी या आंदोलनाच्या माध्यतून देशातील शिक्षण सुधारणेसाठी आणि पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे. पण मुद्दयावरुन आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. तसेच ज्यांना हे आंदोलन गंभीर नाही असे वाटत आहे त्यांनी भर उन्हात ४५ डिग्रीमध्ये इथे बसून दाखवावं असे चॅलेंजही दिले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिजीत दिपके यांनी आंदोलनाबाबत करण्यात आलेल्या आरोपांवर उत्तरे दिली आहेत. आंदोलनाच्या ठिकाणाहून जे व्हिडीओ व्हायरल होतायेत त्यावरून हे आंदोलन गंभीर नाही असा आरोप केला जात आहे,असा प्रश्न अभिजीत दिपकेंना विचारण्यात आला.
“दिल्लीतील ऊन कसे असते हे तुम्हाला माहिती आहे. गेल्या आठवडाभरापासून इथे पाऊस होता. ४५ डिग्री उन्हात आणि भर पावसात आम्ही इथे आंदोलन करत आहोत, अजून किती गंभीर झालो पाहिजे आम्ही, सोनम वांगचूक यांच्यासही विद्यार्थ्यांनी जीव धोक्यात टाकला पाहिजे. अजून किती सिरीयस झालो पाहिजे आम्ही, असा सवाल अभिजीत यांनी विचारला. मग आम्ही थोडे देशभक्तीची गाणी लावली तर त्रास काय आहे याचा, मला सांगा गेल्या २७ दिवसांपासून आम्ही करत असलेले आंदोलन सिरीयस नाही, असे वाटत असेल त्यांनी ४५ डिग्रीत भर उन्हात इथे बसून दाखवाव. नंतर आम्हाला प्रश्न विचारावेत. असे चॅलेंज अभिजीत यांनी दिले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तरी मोठे अमुलाग्र बदल होतील असेच नाही. प्रधान यांनी राजीनामा दिला किंवा त्यांचं खातं बदलल तर तुमची भूमिका काय असेल, यावर बोलताना अभिजीत म्हणाले की, सरकारने काहीतरी पावले उचलायलया हवीत, पण सरकार आंदोलन सुरुच नाही, असं वागत आहे. सोनम वांगचूकच नाही तर आज काही विद्यार्थीदेखील इथे उपोषणाला बसले आहेत, त्यांचाही जीव धोक्यात आहे. पण सरकार बोलायलाही तयार नाही. उलट आंदोलन करणारे, देशद्रोही, दहशतवादी असल्याची भाषा वापरली जात आहे.
अभिजीत दिपके म्हणाले की, आम्ही गेल्या चार दिवसांपासून वांगचूक सरांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण तेम्हणाले मला काहीही बोलू नका, मी उपोषण मागे घ्यावं हे तुम्ही मला बोलू नका, तुम्ही सरकारला दबाव टाका की सरकार विद्यार्थ्यांचे ऐकायला तयार का नाही, त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी कोणीही त्यांच्यावर दबाव टाकू नये, असे ठामपणे त्यांनी सांगितलं आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या आंदोलनात येण्याबद्दल आणि न येण्याबद्दल काय म्हणण आहे. या प्रश्नावर बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, आम्हाला काहीही आक्षेप नाही की कोणत्या राजकीय पक्षांनी यावं किंवा न यावं, हा मुद्दा विद्यार्थ्यांचा आहे. ज्यांना या आंदोलनात यायंच आहे त्यांनी नक्की यावं. पण मला वाटतंय, मुद्द्यावरून भटकवण्यासाठी हे वातावरण मुद्दामून तयार केलं जात आहे. काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशी आमची दुश्मनी नाही, आम्ही उद्या लढलो तर या पक्षंना काही नुकसान होईल असे वाटत नाही. पण सरकार आणि माध्यमांकडूनच हे आंदोलन भटकवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आमचा प्रश्न सरकारला आहे. दुसऱ्या कोणत्या पक्षांनाही,सरकार फेल झाली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान फेल झाले आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत, प्रश्न आहेत त्यांची उत्तरे सरकारनेच दिली पाहिजेत. बाकी कोणत्याही विरोधी पक्षाला आमचा प्रश्न नाही. त्यांच्याही हातात काहीच नाही. त्यांच्या हातात नीटचा पेपर नाही, त्यांच्या हातात सरकार नाही, आमचा प्रश्न आणि मागण्या शिक्षण मंत्र्यांसाठी आहेत.