Congress-BJP Clashes: बिहारमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांची सध्या मत अधिकार यात्रा सुरू आहे. निवडणूक आयोगावरील मतचोरीचे आरोप आणि बिहार निवडणुकीपूर्वी सुरू असलेली विशेष सघन पुर्नपडताळणी यांविरोधात ही यात्रा काढली जात आहे. अशातच बिहारची राजधानी पटना येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजधानी पटना मध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती आहे.
दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी अशी होती की ज्याच्या हातात जे काही होते ते त्यानेच हाणामारी करत होते. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. विटा आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली. काही भाजप कार्यकर्ते हे काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसविरुद्धच्या निदर्शन करण्यासाठी जमले होते. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाले.
पंतप्रधान मोदींविरुद्ध वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते. या संदर्भात ते सदकत आश्रम (काँग्रेस कार्यालय) बाहेर काँग्रेसविरुद्ध निदर्शने करण्यासाठी जमले होते. भाजप कार्यकर्त्यांच्या हातात फलक होते ज्यावर “मां का अपमान, कांग्रेस की पहचान”, “मां का अपमान नहीं सहेगा बिहार” असे घोषणा लिहिलेल्या होत्या.
लाठीचार्ज दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला. दोन्ही बाजू माघार घेण्यास तयार नव्हत्या. यामध्ये दोन्ही पक्षांचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. याच हाणामारीत काही भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात घुसखोरी कऱण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना हाकलून लावले आणि त्यानंतर हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली. मारहाण वाढत गेली आणि गोंधळबी वाढत गेला.
काँग्रेसच्या मंचावरून पंतप्रधान मोदींना शिवीगाळ केल्यानंतर, आज (शुक्रवार) भाजपने कुर्जी रुग्णालयापासून पाटण्यातील सदाकत आश्रमापर्यंत मोर्चा काढला. त्यात भाजप कार्यकर्त्यांसह मंत्री संजय सरावगी आणि नितीन नवीन हेही उपस्थित होते. दुसरीकडे, काही जखमींना उपचारासाठी कुर्जी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक आणि हाणामारीचे आरोप केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे डीएसपी घटनास्थळी पोहोचले त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
राजद आणि काँग्रेसच्या संयुक्त रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अपशब्दांचा वापर करण्यात आला होता. त्यानतंर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत पटनातील काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यादरम्यान, भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या अपमानास्पद टिप्पणीच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला.
“भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाचे गेट तोडले, कार्यालयात घुसून लाठीमार केली. त्यांनी कार्यालयात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. विटा आणि दगडफेकही केली. यामध्ये काही काँग्रेस कार्यकर्ते जखमीही झाले आहेत. एका कार्यकर्त्यांचे डोक्याला फ्रॅक्चर झाले आहे. भाजप नेत्यांनी सदाकत आश्रमात घुसखोरी करत राहुल गांधी आणि इंडिया अलायन्सच्या इतर नेत्यांविरुद्ध घोषणाबाजी केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले आहेत.
काँग्रेस आणि राजदच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आरोपीला बिहार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव रिझवी उर्फ राजा असून तो दरभंगाचा रहिवासी आहे. या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि राजदवर तीव्र टीका केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत लिहिले की, “बिहारच्या दरभंगा येथे काँग्रेस आणि राजदच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई यांच्याबद्दल करण्यात आलेली अपमानास्पद वक्तव्ये केवळ निषेधार्ह नाहीत, तर आपल्या लोकशाहीलाही कलंकित करणारी आहेत.”
“राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे राजकारण सर्वात खालच्या पातळीवर गेले आहे. एका गरीब आईचा मुलगा गेल्या ११ वर्षांपासून पंतप्रधानपदावर कसा बसला आहे आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर नेत आहे, हे काँग्रेसला सहन होत नाही. त्यामुळेच काँग्रेस पुन्हा एकदा अशा अशिष्ट वर्तनाकडे वळली आहे, ज्यामुळे देशाची राजकीय संस्कृती नेहमीच विषारी बनली आहे.” असंही अमित शाहांनी म्हटलं आहे. तसेच, “गुजरातच्या मुख्यमंत्रिपदापासून आजपर्यंत गांधी कुटुंबाने मोदीजींविरुद्ध द्वेष पसरवण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. मात्र यावेळी त्यांनी शिष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हा प्रत्येक आईचा आणि प्रत्येक मुलाचा अपमान आहे, ज्यासाठी १४० कोटी देशवासी त्यांना कधीही माफ करणार नाहीत.”