Congress Vs RSS: काँग्रेसचे नेते आणि मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विधानाने देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. काँग्रेसचे केंद्रात सरकार आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल असे वादग्रस्त विधान केले आहे. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यासह अन्य नेते नेहमीच संघावर टीका करताना दिसून येतात. मात्र आता खर्गे यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस, राहुल गांधी नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना दिसून येतात. देशाचे विभाजन केल्याचा आरोप ते संघावर करताना दिसून येतात, मात्र प्रियंक खर्गे यांच्य संघावर देशभरात बंदी घालण्याचा विधानाने राजकारण सुरु झाले आहे आणि नवीन वाद देखील उभा राहिलेला पाहायला मिळत आहे.
संघावर बंदी घातली पाहिजे – प्रियांक खर्गे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या राजनीतिक शाखा म्हणजे भाजप पक्षाला बेरोजगारी, पहलगाम दहशतवादी हल्ला याबाबत का प्रश्न विचारत नाही? संघ असे प्रश्न न विचारून समाजामध्ये फूट निर्माण करत आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यावर कायदेशीर प्रक्रिया करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देशभरात बंदी घालण्यात येईल.
प्रियंक खर्गे यांनी संघाबाबत केलेले असे विधान हे काही पहिल्यांदा आहे असे नाही. त्यांनी कर्नाटक राज्यात जर कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर, सरकार अशा संघटनेवर बंदी घालण्यास अजिबात मागेपुढे पाहणार नाही असे सांगितले होते. केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चौकशी का करत नाही? ईडी, इन्कम टॅक्स आणि अन्य यंत्रणा केवळ विरोधी पक्षांसाठीच आहेत का? संघाकडे पैसा कुठून येत आहे याची चौकशी सरकार का करत नाही? असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला आहे.
याआधी देखील संघावर आली होती बंदी
केशव बळीराम हेडगेवार यांनी विजयादशमीच्या दिवशी २७ सप्टेंबर १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. मात्र संघावर आतापर्यंत तीन वेगवेगळ्या कारणांमुळे बंदी घालण्यात आली होती. १९४८ मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर १८ महिने प्रतिबंध घालण्यात आला होता. त्यानंतर १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली असता संघावर बंदी घातली होती. तर १९९२ मध्य देखील अयोध्या प्रकरणात संघावर बंदी घालण्यात आली होती, मात्र ती ६ महिन्यांनी उठवण्यात आली होती.