Defence Minister Rajnath Singh discusses India-Pakistan war with Army Chiefs in Delhi
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने त्यांचे नापाक हल्ले सुरु केले आहेत. भारताच्या जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. भारताने पाकिस्तानच्या सर्व हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर भारताकडून देखील आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. भारताने लाहोरमध्ये हल्ला केला आहे. भारताने लाहोरवर ड्रोन हल्ला केला आहे. यानंतर दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे.
राजनाथ सिंह यांनी सीडीएस आणि तिन्ही लष्कर प्रमुखांशी चर्चा केली
गुरुवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या अयशस्वी हल्ल्याच्या प्रयत्नानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान यांच्याशी चर्चा केली आहे. सिंह यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांकडूनही अपडेट्स घेतले. तिकडे नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि महत्वाच्या नेत्यांमध्ये महत्वाची बैठक सुरू आहे. आज रात्री भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय होतो हे पहावे लागणार आहे.याआधीही भारताने पाकिस्तानकडून येणारे अनेक रॉकेट नष्ट केले होते. पाकिस्तानने भारतातील १५ शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय सैन्याने सर्व हल्ले हाणून पाडले.
जम्मू काश्मीरमधील सर्व प्रमुख शहरांमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मूमध्ये लक्ष्यित ड्रोन हल्ला केला. त्याच वेळी, भारतीय सैन्याच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हा हल्ला पूर्णपणे हाणून पाडला. जम्मूमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. जम्मूमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि मोबाईल सेवा विस्कळीत झाली. जम्मूच्या अनेक भागात ड्रोन देखील दिसले आहेत. जम्मूसह, सांबा, आरएस पुरा, अखनूर येथेही वीजपुरवठा खंडित झाला आहे. जम्मूमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जम्मू काश्मीरसह देशातील इतर शहरांमध्ये देखील ब्लॅकआऊट करण्यात आले आहेत. पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील महत्त्वाच्या ठिकाणांवरील वीजपुरवठा बंद करण्यात आला. अमृतसरमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आला असून हॉटेल्स आणि बाजारपेठेतील दिवे बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून पठाणकोट एअरबेसवरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. पण भारतीय हवाई सुरक्षा प्रणालीने तोही निष्फळ ठरवला.