कर्मचाऱ्यांचे भवितव्य पणाला, PF देण्यासाठी पैसेच नाही;एमडी अजय सिंग यांच्या विरोधात एफआयआर (फोटो सौजन्य-X)
देशातील खासगी क्षेत्रातील विमान कंपनी स्पाइसजेटच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. नुकतीच माहिती समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीने कर्मचाऱ्यांची पीएफची थकबाकी भरली असून कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिले असले तरी, कंपनी सुटकेचा नि:श्वास सोडू शकली नाही. कारण दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) स्पाइसजेटचे एमडी अजय सिंग आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये अप्रामाणिकपणा आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, स्पाईसजेटने 65.7 कोटी रुपयांचे पीएफ योगदान दिलेले नाही, असा आरोप EPFO ने केला आहे. स्पाइसजेटमध्ये सुमारे 10 हजार कर्मचारी काम करतात. कंपनी दरमहा त्यांच्या पगारातून १२ टक्के पीएफ कापते. स्पाइसजेटने जून 2022 ते जून 2024 पर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेले पैसे पीएफ खात्यात जमा केलेले नाहीत. त्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
अजय सिंग यांच्याशिवाय शिवानी सिंग आणि अन्य संचालकांवर कारवाई करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने 16 सप्टेंबर रोजी ही एफआयआर नोंदवली आहे. अजय सिंग यांच्याशिवाय स्पाइसजेटच्या संचालिका शिवानी सिंग, स्वतंत्र संचालक अनुराग भार्गव, अजय छोटेलाल अग्रवाल आणि मनोज कुमार यांच्या नावांचा यात समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेले पैसे वेळेवर ईपीएफओकडे जमा करणे आवश्यक असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
स्पाईसजेटने 4 ऑक्टोबर रोजीच घोषणा केली होती की त्यांनी 10 महिन्यांचे पीएफ पैसे जमा केले आहेत. याशिवाय क्यूआयपीच्या माध्यमातून 3000 कोटी रुपये उभारून कर्मचाऱ्यांचे पगार आणि जीएसटीही भरला आहे. स्पाईसजेट रिकव्हरीच्या मार्गावर असल्याचे एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले होते. आम्ही आमच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडू. याशिवाय कंपनीने विमान भाड्याने देणाऱ्या कंपन्यांशीही समझोता केला आहे. मात्र, या एफआयआरनंतर विमान कंपनीसाठी सध्या स्थिती सामान्य असल्याचे दिसत नाही. स्पाइसजेटचा शेअर शुक्रवारी घसरला.
तसेच केएएल एअरवेज आणि कलानिथी मारन यांनी स्पाइस जेट आणि अजय सिंग यांच्याकडून सुमारे 1,323 कोटी रुपयांच्या नुकसानीची मागणी केली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. हा वाद फेब्रुवारी 2015 चा आहे. मारन आणि त्यांच्या KAL एअरवेजने स्पाइसजेटमधील त्यांचा 58.46 टक्के हिस्सा अजय सिंगला हस्तांतरित केला होता. सुमारे 1,500 कोटी रुपयांचा हा सौदा असल्याचे म्हटले जात आहे.