मालवाहतुकीचा खर्च २ हजार डॉलरवरून ७, ५०० डॉलर्सवर पोहोचला
नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत भारतीय तांदळाची मागणी स्थिर आहे. जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत भारतातून होणारी तांदूळ निर्यात १२.२७ कोटी टनांपर्यंत वाढली. मात्र, जुलैपासून मालवाहू कंटेनर्सचा तुटवडा आणि सागरी वाहतुकीच्या खर्चात झालेली प्रचंड वाढ त्यामुळे निर्यातीच्या वेगावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी एका खेपेचा वाहतूक खर्च १ हजार ५०० ते २ हजार डॉलर्स होता, तो आता ७ हजार ते ७ हजार ५०० डॉलर्सवर पोहोचला आहे. त्यामुळे निर्यातदारांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वर्षाच्या पूर्वार्धात दिसून आलेला तांदूळ निर्यातीचा वेग कायम राखणे आता कठीण झाले आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या काळात भारताने ११.६८ कोटी टन तांदळाची निर्यात केली होती; यावर्षी याच काळात हा आकडा १२.२७ कोटी टनांवर पोहोचला. भू-राजकीय तणाव आणि युद्धासारखी परिस्थिती असूनही, भारताने तांदूळ निर्यातीत सुमारे ५ टक्के वाढ नोंदवली आहे.
भारताचा वाटा 40 टक्के
जागतिक तांदूळ बाजारपेठेत थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान हे भारताचे प्रमुख स्पर्धक आहे. तरीही, या देशांच्या तुलनेत भारतीय तांदळाच्या स्पर्धात्मक दरांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचे स्थान मजबूत राहिले. व्यापाऱ्यांच्या मते, जगातील एकूण तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा जवळपास ४० टक्के आहे. गेल्या हंगामात देशातील तांदळाचे उत्पादन उत्तम झाले होते. देशांतर्गत मागणीपेक्षा उत्पादन अधिक झाल्यामुळे निर्यातीसाठी पुरेसा तांदूळ उपलब्ध होता.
भारतीय तांदळाचे दर कमी असल्याने निर्यातीला चालना
तसेच, थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय तांदळाचे दर कमी असल्याने निर्यातीला चालना मिळाली. पहिल्या सहा महिन्यांत तांदूळ निर्यातीत झालेली ५ टक्के वाढ ही सकारात्मक बाब आहे. मात्र, जुलैपासून मालवाहू कंटेनर्सचा तुटवडा आणि वाहतूक खर्चात झालेली मोठी वाढ ही निर्यातीसाठी गंभीर आव्हाने ठरलीत. जागतिक बाजारपेठेत आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी, सरकारने मालवाहतुकीची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे.
बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ
बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीत सुमारे ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बांगलादेश, श्रीलंका, कॅमेरून आणि आफ्रिकेतील विविध देशांकडून बिगर-बासमती तांदळाला मोठी मागणी आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीत झालेली घट बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीमुळे भरून निघाली, त्यामुळे देशाच्या एकूण तांदूळ निर्यातीच्या आकडेवारीला बळकटी मिळाली. पहिल्या सहा महिन्यांत निर्यातीची कामगिरी चांगली राहिली असली, तरी जुलैपासून परिस्थिती बदलली आहे.
वाहतुकीच्या दरांमध्ये मोठी वाढ
निर्यातदारांना आवश्यक कार्गो कंटेनर्सच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे वाहतुकीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली. काही महिन्यांपूर्वी एका मालाच्या खेपेची (कन्साइनमेंट) वाहतूक करण्यासाठी १ हजार ५०० ते २ हजार डॉलर्स खर्च येत असे, परंतु आता तो खर्च वाढून ७ हजार ते ७ हजार ५०० डॉलर्सवर पोहोचला आहे.






