बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; धर्मशाळेची भिंत कोसळून भाविकाचा मृत्यू, ११ जखमी
बागेश्वर धाममध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. धर्मशाळेची भिंत कोसळून उत्तर प्रदेशातील एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून ११ भाविक जखमी झाले आहेत. छतरपूर जिल्ह्यातील गढ़ा गावात असलेल्या बागेश्वर धाममध्ये मंगळवारी पहाटे ३:३० वाजता धर्मशाळेची जुनी भिंत कोसळली. त्यानंतर मोठा आरडाओरडा झाला. अवघ्या ५ दिवसांत दोन मोठ्या घटना घडल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यापूर्वी ३ जुलै रोजी एका वृद्ध व्यक्तीला मंडप कोसळून आपला जीव गमवावा लागला. अवघ्या ५ दिवसांत दोन मोठ्या घटना घडल्याने भाविकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पंढरपूर हादरलं ! पत्नीने मुलांसह आत्महत्या केल्याचे समजताच पतीनेही घेतला गळफास; परिसरात एकच खळबळ
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी भिंत कोसळल्यानंतर मोठा आरडाओरडा झाला. झोपलेले भाविक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यात उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील अदलहाट गावातील रहिवासी अनिता देवी खरवार (४०) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत जखमी झालेल्या इतर ११ भाविकांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे, त्यांना ग्वाल्हेरमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. घटनेनंतर लगेचच बामिठा पोलिस स्टेशन आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी पोहोचली आणि रात्रीच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
छतरपूरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (सीएमएचओ) डॉ. आर.पी. गुप्ता म्हणाले, “सकाळी मुसळधार पाऊस आणि वीज पडल्यामुळे धर्मशाळेची भिंत कमकुवत झाली आणि कोसळली. गंभीर जखमी झालेल्या चार जणांना ग्वाल्हेरमध्ये हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच बामिठा पोलिस स्टेशन आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने ढिगाऱ्यातून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मृत अनिता देवीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आणि प्रशासनाने तिच्या कुटुंबाला भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.
पाच दिवसांपूर्वीच मंडप कोसळून एका भाविकाचा मृत्यू झाला होता. बागेश्वर धाममध्ये पाच दिवसांत हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी, ३ जुलै २०२५ रोजी, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील सिकंदरपूर येथील रहिवासी श्यामलाल कौशल (५०) यांचा धाम परिसरात तंबू कोसळून मृत्यू झाला. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे तंबूचा एक भाग कोसळल्याने ही घटना घडली. श्यामलाल यांच्या डोक्यावर लोखंडी अँगल आदळला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत राजेश कुमार कौशल, सौम्या, पारुल आणि उन्नती यांच्यासह ८ जण जखमी झाले होते.
८ जुलैच्या अपघातानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी भाविकांना त्यांच्या घरी गुरुपौर्णिमा साजरी करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, “लाखो लोक बागेश्वर धाममध्ये पोहोचत आहेत, परंतु पाऊस आणि गर्दीमुळे व्यवस्थांवर परिणाम होत आहे. आम्हाला कोणत्याही भाविकाच्या श्रद्धेला धक्का पोहोचू नये किंवा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये अशी आमची इच्छा आहे.” भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द करण्याची घोषणाही केली. प्रशासनाची कारवाई तपास सुरू: प्रशासनाने दोन्ही अपघातांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.