विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या (फोटो सौजन्य-X)
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे कौटुंबिक वादातून चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी हा प्रकार घडला. यामध्ये महिलेने दोन मुलांसह आपल्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मोनाली हिने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी टाकल्याचे समजताच पती म्हमाजी यानेदेखील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पत्नी मोनाली (वय 25), मुलगा कार्तिक (वय 6) आणि मुलगी प्रगती (वय 4) यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कासेगावातील शेतात जाऊन या विहिरीतून मोनाली आणि तिच्या दोन चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले. घटना घडल्यापासून सातत्याने विहिरीतले पाणी उपसणे सुरू होते. सध्या मुलगा कार्तिक याचा मृतदेह सापडला आहे. बाकीचे मृतदेह शोधण्यासाठी पंढरपूरची आपत्कालीन यंत्रणा विहिरीत उतरून शोध घेत आहे.
दरम्यान, पंढरपूर तालुका पोलिसात याची नोंद झाली असून, पुढील तपास पोलिस यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे. कुटुंब प्रमुख आणि गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या म्हमाजी आसबे याचा मृतदेह पोलिसांनी खाली उतरवला. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
कासेगावावर शोककळा
म्हमाजी आसबे यांची कासेवागावत शेती असून, त्यांच्या द्राक्ष बागेतील विहिरीतच पत्नी मोनालीने तिच्या दोन चिमुकल्या मुलासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अनपेक्षित अशा प्रकाराने कासेवागात शोककळा पसरली आहे.
उत्तर प्रदेशातही तरुणाची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, उत्तरप्रदेश येथील सहारनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने पत्नीच्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गळफास लावलेल्या तरुणाचे नाव सौरभ असे आहे. सौरभचे लग्न पाच वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना चार वर्षांचा एक मुलगाही आहे.