
कॅशलेस पॉलिसी तरीही, हॉस्पिटलच्या बिलाच्या १०% रक्कम भरावी लागणार
आजारपणासोबतच, आपल्या प्रियजनांच्या उपचारासाठी पैशांची व्यवस्था करण्याचा ताण वाढणार आहे. नव्या नियमात हे बदल करण्यात आले आहेत. त्यात जर हॉस्पिटलचा एकूण खर्च १० लाख असेल, तर विमा कंपनी फक्त ९ लाख देईल. देशातील सर्व सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांची प्रतिनिधी संस्था असलेल्या सर्वसाधारण विमा परिषदेने प्रस्तावाचा मसुदा जवळपास तयार केला आहे. तो मंजुरीसाठी विमा नियामक, आयआरडीएकडे पाठवला जाईल. प्रस्तावानुसार, विमा कंपन्या या 10 टक्के नियमाच्या अनुषंगाने ग्राहकांसाठी वेगवेगळ्या पॉलिसी सादर करतील.
दरम्यान, या नव्या नियमानुसार, ज्यांचे प्रीमियम कमी आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च स्वतःच्या खिशातून भरावा लागेल. तर, त्यांच्या पॉलिसींमध्ये कोणतीही कपात (डिडक्टिबल) नाही, त्यांना जास्त प्रीमियम भरावा लागेल. याचा अर्थ असा की, मध्यमवर्गीय पॉलिसीधारकांना अपरिहार्यपणे नुकसान सोसावे लागेल.
उपचारांसाठी मोजावे लागतील पैसे?
कॅशलेस उपचारांसाठीही तुम्हाला पैसे मोजावे लागतील. हा नियम केवळ नंतर मिळणाऱ्या दाव्यांनाच नाही, तर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लगेच मिळणाऱ्या कॅशलेस उपचारांनाही लागू होतो.
अपघाताच्या बाबतीत कोणतीही सूट नाही
आजारपणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अपघातामुळे किंवा दुर्घटनेमुळे रुग्णालयात दाखल झाल्यास, तुम्हाला खर्चाच्या 10 टक्के रक्कम स्वतः भरावी लागेल. (केवळ बाह्यरुग्ण भेटी, म्हणजेच ओपीडीचा खर्च वगळण्यात आला)
इतर पॉलिसींद्वारेही रक्कम परत नाहीच
ही १०% रक्कम भरण्यासाठी तुम्ही दुसरी विमा पॉलिसी किंवा वेगळे कव्हर (रायडर) खरेदी करू शकणार नाही. तुम्हाला ही रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागेल.