Bombay High Court (Photo - X)
पुणे : पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाला (Pune MPSC Student Protest) आता न्यायालयीन वळण मिळालं आहे. आंदोलनाविरोधात एका पुणेकर नागरिकाने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार, पोलिस आणि आंदोलनाच्या आयोजकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी सकाळी 10.30 वाजता होणार आहे
पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आक्षेप घेत याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुण्यातील आंदोलकांनी तात्काळ आंदोलनाची जागा सोडावी, सरकारने आंदोलनासाठी निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी आणि आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.
या याचिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC आंदोलनाचा मुद्दा आता थेट न्यायालयाच्या पटलावर आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारसोबतच पुणे पोलिसांनाही नोटीस बजावली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस उपआयुक्तांसह आंदोलनाचे प्रमुख आयोजक प्रमोद पाटील, नितीन आंधळे आणि चेतन वाघज यांनाही नोटीस देण्यात आली आहे.
या प्रकरणावर बुधवारी सकाळी 10.30 वाजता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता सरकार आणि पोलिसांकडून न्यायालयात काय भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आंदोलनं सरकारी पातळीवर हाताळणं शक्य न झाल्यास न्यायालयीन आदेशाचा मार्ग स्वीकारला जात असल्याचं चित्र अलीकडच्या काही आंदोलनांमध्ये पाहायला मिळालं आहे. मुंबईतील मराठा आंदोलनासह विविध आंदोलनांमध्येही न्यायालयीन हस्तक्षेपाचा मुद्दा समोर आला होता.
आता पुण्यातील MPSC आंदोलनाविरोधात दाखल झालेल्या याचिकेमुळे या आंदोलनाबाबतही न्यायालय काय भूमिका घेतं, हे बुधवारी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे MPSC आंदोलन सुरू राहणार की त्यासाठी पर्यायी जागा निश्चित होणार, याकडे आंदोलक आणि पुणेकरांचं लक्ष लागलं आहे.






