नवी दिल्ली : वसईतील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची सर्वाधिक चर्चा झाली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपी आफताब पुनावाला याला अटक केली. या घटनेनंतर आता दिल्लीतील उत्तम नगर परिसरात अशाच प्रकारची घटना घडली. एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह पिशवीत भरून नाल्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुभम आणि फातमा या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली तर त्यांचा तिसरा साथीदार सनी हा फरार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ‘उत्तमनगरच्या शिव विहार येथील डंपयार्डसमोरील नजफगढ नाल्यात एक मोठी पिशवी फेकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलो. तेथे आम्हाला एक बॅग सापडली, जी डिलिव्हरीसाठी ई-कॉमर्स साइटद्वारे वापरली जाते. बॅगमध्ये आम्हाला 20 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला’.
सनीला होते ड्रग्जचे व्यसन
पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली असून, हा मृतदेह विकासनगर येथील रहिवासी उमेशचा आहे. रविवारी सायंकाळी तो त्याच्या परिचयाच्या सनी याच्या खोलीत गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. सनीला ड्रग्जचे व्यसन होते. त्या ठिकाणी काही कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली आणि उमेश याची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिघांनी मिळून त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले.