
पैशाच्या वादातून निघृण खून
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल फोन व पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून ३० वर्षीय तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
शकील आरेफ शेख (वय ३०, रा. फुलेनगर, पंढरपुर) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. कासंबरी दर्गा, पडेगाव परिसरातील चौघा संशयितांनी तरुणाच्या पायाला सिगारेटचे चटके देत, हाताच्या नसा कापून गळा चिरत खून केला. मृतदेह जटवाडा परिसरात फेकून दिला. काही तासात छावणी पोलिसांनी आरोपींपैकी एक सय्यद सिराज अली सय्यद नसेर अली याला बेड्या ठोकल्या आहेत. तर उर्वरित आरोपी छोटा सिराज, जब्बार, कबीर (सर्व रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, याप्रकरणात मृत शकीलचा भाऊ सलमान आरेफ शेख (वय २८) याने फिर्याद दिली. त्यानुसार, घटनेच्या ८ ते १० दिवस आधी कासंबरी दर्गा, पडेगाव येथील सिराज याने शकीलच्या आईच्या मोबाईलवर फोन करून, शकीलने मोबाईल व पैसे नेल्याचा आरोप करत ते परत न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. यावेळी नातेवाईकांनी मध्यस्थी करून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला होता.
चार जानेवारीला मात्र…
४ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजता सिराज हा शकीलच्या घरी आला. त्यानंतर शकील व सिराज दोघे घरातून बाहेर गेले. त्याच रात्री १० वाजता शकीलने आईला फोन करून आपण छोटा सिराज, मोठा सिराज, जब्बार व कबीर यांच्यासोबत कासंबरी दर्गा येथे असल्याचे सांगितले. थोड्याच वेळात घरी येतो असे म्हणाला. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही.
पोलिसांकडून चौकशी सुरु
६ जानेवारी रोजी सकाळी पोलिसांनी शकीलच्या आईशी संपर्क साधत चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी घरच्यांना एका अज्ञात मृतदेहाचे फोटो दाखवले असता तो मृतदेह शकील शेख याचाच असल्याची ओळख पटली.
मॉर्निंग वॉकला जाताना दिसला मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिटमिटा परिसरातील उर्जाभूमी, जटवाडा येथे मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात एक तरुण मृतावस्थेत आढळून आला. नागरिकांनी तत्काळ सुरक्षारक्षाकासह पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
आठवडाभर प्लॅन करून केली हत्या
४ जानेवारी रात्री १० ते ६ जानेवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान मोबाईल व पैशांच्या वादातून संशयितांनी शकील शेख याला मारहाण केली व धारदार हत्याराने त्याचा गळा चिरुन खून केला. आठवडाभरापूर्वी आरोपी सिराजने आरेफच्या आईला फोन केल्यापासून त्यांच्यात वादाची ठिणगी पडलेली होती. तेव्हापासून त्याच्यावर त्यांची नजर होती. त्यांनी त्याला पार्टीचे आमिष देत त्यांनी जटवाडा परिसरात नेले. तिथे त्यांनी नशा करत ओली पार्टी करून तेथे हत्या केली.