नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारकडून विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यात आता देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून (Red Fort) पंतप्रधान मोदींनी जनऔषधी (Jan Aushadhi Kendra) केंद्राची घोषणा केली आहे. सध्या देशभरातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 आहे. आता ही संख्या 25,000 पर्यंत वाढवण्याची योजना आहे. जेनेरिक औषधांची उपलब्धता वाढवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच ते लोकांच्या उत्पन्नाचे चांगले साधनही बनत आहेत.
जनऔषधी ही योजना अत्यंत फायदेशीर अशी ठरत आहे. कारण, देशातील जनतेला आजारांवर उपचारासाठी औषधे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात ही केंद्रे मोठी भूमिका बजावत आहे. या योजनेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. यापूर्वी सरकारने मार्च 2024 पर्यंत देशभरात 10,000 जन औषधी केंद्रे सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, हे उद्दिष्ट त्याच्या नियोजित वेळेपूर्वीच पूर्ण होताना दिसत आहे. यापूर्वी 2014 मध्ये देशात केवळ 80 केंद्रे होती. मात्र, मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात या जनसंख्येची वाढ झाली आहे. औषधी केंद्रांची संख्या वाढून 9,884 झाली आहे.
प्रत्येक गल्लीत जनऔषधी केंद्र उघडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर आता देशातील जवळपास प्रत्येक गल्लीबोळात जनऔषधी केंद्रे उघडलेली दिसतील. कारण सरकार आपले जुना उद्देश पूर्ण करण्याच्या जवळ आहे आणि पंतप्रधान मोदींनी दीड वर्ष सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पूर्वीपेक्षा पटींनी जास्त केंद्रे पूर्ण झाली. लोकांना स्वस्तात जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणारी ही जनऔषधी केंद्रे खरे तर एखाद्या छोट्या मेडिकल स्टोअरसारखी आहेत.
दुकान सुरु करण्यासाठी पात्रता काय?
प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी 5,000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. ही केंद्रे उघडण्यासाठी अर्जदाराने डी. फार्मा किंवा बी. फार्मा प्रमाणपत्र आवश्यक आहे. याशिवाय, तुमच्याकडे केंद्र उघडण्यासाठी पुरेशी जागा असावी, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे 120 चौरस फूट निश्चित करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान, विशेष श्रेणी आणि विशेष क्षेत्राच्या अर्जदारांसाठी शुल्कात सूट देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. केंद्रावर अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, फार्मासिस्ट नोंदणी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, वैध मोबाइल क्रमांक, रहिवासी प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे आवश्यक आहेत.