पंजाबमध्ये मुसळधार पावसाचा फटका; पुरानंतर भूस्खलन, रेल्वेट्रॅकवर ढिगारा, 23 रेल्वे विस्कळीत
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांत मुसळधार पाऊस होत आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाबसह अनेक राज्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतात पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हरिद्वारमधील बोगद्याजवळ रेल्वे ट्रॅकवर ढिगारा पडला होता. त्यामुळे रेल्वे वाहतूक सुमारे 11 तास बंद होती. या काळात 23 गाड्यांना मोठा फटका बसला.
पंजाबमध्ये पुरामुळे मृतांचा आकडा 51 वर पोहोचला आहे आणि 3.87 लाख लोक प्रभावित झाले आहेत. 4.34 लाख एकर क्षेत्रातील पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. राज्य सरकारने प्रति एकर 20000 रुपये भरपाई जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्येही पावसामुळे परिस्थिती बिकट आहे आणि अनेक रस्ते बंद आहेत. कटरा येथील माता वैष्णोदेवी यात्रा सलग 14 व्या दिवशीही स्थगित राहिली. हरिद्वारमधील काली माता मंदिराजवळील भीमगोडा रेल्वे बोगद्याजवळील रेल्वे ट्रॅकवर डोंगरावरून ढिगारा पडला. एका महिन्यात अशी ही दुसरी घटना होती.
हेदेखील वाचा : Punjab Floods: पंजाबमधील पुरामुळे भगवंत मान सरकारची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना मिळणार भरपाई
दरम्यान, रेल्वे ट्रॅकवर ढिगारा पडल्यामुळे डेहरादून-ऋषिकेश आणि हरिद्वार दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचे कामकाज थांबले. 23 गाड्यांचे कामकाज प्रभावित झाले. यामध्ये चंदौसी ऋषिकेश, हावडा योगनगरी ऋषिकेश दून एक्सप्रेस, अमृतसर देहरादून एक्सप्रेस, बारमेर ऋषिकेश एक्सप्रेस यांचा समावेश होता. पाच बसेसने प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पाठवण्यात आले. सोमवारी सायंकाळी पाच वाजता ट्रॅक उघडण्यात आला.
मृतांचा आकडा पोहोचला 51 वर
पंजाबमधील पुरामुळे मृतांचा आकडा 51 वर पोहोचला आहे. पुरामुळे 4.34 लाख एकर पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे बासमती तांदळाच्या निर्यातीवर २५ टक्के परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. आतापर्यंत पूरग्रस्त भागातून २३,०१५ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
बचावासाठी 30 हेलिकॉप्टर तैनात
123 मदत छावण्यांमध्ये 5416 लोक राहत आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराने 30 हेलिकॉप्टर तैनात केले आहेत, तर बीएसएफ, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके जमिनीवर मदत करत आहेत. भात पिकाच्या नुकसानाबाबत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, एकूण 12 लाख टन तांदळाच्या उत्पादनावर परिणाम होईल. यामध्ये ६ लाख टन बासमतीच्या उत्पादनाचा समावेश आहे.