'कर्नाटकातील प्रसिद्ध धर्मस्थळमध्ये पुरलेत शेकडो मृतदेह '; स्वच्छता कामगाराच्या दाव्याने देशभरात खळबळ
कर्नाटकातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या धर्मस्थळमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे पूर्वी स्वच्छता कामगार म्हणून काम केलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना पत्र लिहून धरकाप उडवणारा दावा केला आहे. गेल्या दशकभरात शेकडो खून करण्यात आले आणि त्यांना याच भागात दफन करण्यात आले होते, त्यांना दफन करण्याची जबाबदारी आपल्याकडे दिली होती, असा दावा त्यांने पत्रात केला आहे. इतक्या वर्षांनंतर मला पश्चाताप झाल्यामुळे मी याचा खुलासा करत असल्याचं त्याने म्हटलं असून कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. एका राष्ट्रीय वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
१९९५ ते २०१४ दरम्यान धर्मस्थळा येथे स्वच्छता कामगार म्हणून काम केलेल्या या व्यक्तीने अलीकडेच ओजस्वी गौडा आणि सचिन देशपांडे यांच्या माध्यमातून आपले पत्र प्रसारित केलं. त्यानंतर धर्मस्थळ पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २११(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमानुसार, माहिती देण्यास कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असलेल्या व्यक्तीने ती माहिती नाही दिली तर त्याच्यावर कारवाई केली जाते.
या माजी स्वच्छता कर्मचाऱ्याने सांगितले की, त्याने स्वतः अनेक हत्याकांड प्रत्यक्ष पाहिले असून त्यानंतर त्याला मृतदेह गाडण्यास, काही वेळा डिझेल टाकून जाळण्यासही भाग पाडले गेले. १९९८ साली जेव्हा त्याने एका हत्येची माहिती पोलिसांना देण्याची तयारी दर्शवली, तेव्हा त्याच्या पर्यवेक्षकाने त्याला जबर मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप त्याने केला आहे.
त्याच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणांमध्ये काही “प्रभावशाली व्यक्ती” सामील होत्या. एवढेच नव्हे तर त्याच्या कुटुंबातील एका मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्यानंतर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला धर्मस्थळ सोडून पळून जावे लागले होते.
त्याने पत्रात लिहिले की, “मी जेव्हा जेव्हा मृतदेह गाडले, तेव्हा त्यांचा सन्मानपूर्वक अंतिम संस्कार झालेला नव्हता. अनेक मृतदेह हे तरुण मुलींचे होते, आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांना गळा दाबून मारल्याचे दिसून येत होते. आजही त्या आत्म्यांचा विचार मला खायला उठतो आहे. त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून आता या प्रकरणाची चौकशी होणं अत्यावश्यक आहे.”
स्वतःच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्याने सध्या संबंधित व्यक्तींची नावे उघड केलेली नाहीत. मात्र, ‘भारतीय साक्ष अधिनियम’ अंतर्गत पोलीस संरक्षण मिळाल्यानंतर तो संपूर्ण माहिती उघड करण्यास तयार असल्याचे त्याने पत्रात नमूद केले आहे. धर्मस्थळ पोलीस विभागाने या पत्राची गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित परिसरातील पुरातन पुरावे तपासण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन ज्या-ज्या जागी मृतदेह गाडण्यात आले, त्या ठिकाणी उत्खनन करण्याची तयारी चालू केली आहे.या प्रकाराची सखोल चौकशी झाल्यास कदाचित अनेक जुने खून उघडकीस येऊ शकतात, असे संकेतही पोलिसांनी दिले आहेत.धर्मस्थळ सारख्या धार्मिक आणि शांततेच्या प्रतिक असलेल्या गावात जर खऱ्या अर्थाने शेकडो लोकांची गूढ मृत्यू होत असतील, तर ही बाब केवळ कर्नाटकासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी धक्कादायक बाब आहे.