दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सध्या सुरु आहे. देशभरासह राज्यामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला चांगले मताधिक्य मिळत असल्याचे चित्र आहे. इंडिया आघाडीने दिलेल्या चुरशीच्या लढतीमुळे भाजपचे 400 पारचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे. इंडिया आघाडीची 225 जागांवर आघाडी आहे. त्यामुळे इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे राहुल गांधी हे पुढचे पंतप्रधान होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु
इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. देशातील एकूण 543 जागांपैकी 297 जागांवर भाजप तर 227 जागांवर इंडिया आघाडीची आघाडी दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे तर इंडिया आघाडीकडून जल्लोष केला जात आहे. इंडिया आघाडीची सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या असून फोनवर बोलणी देखील केली जात आहे. शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा कल लक्षात घेऊन शरद पवार यांनी नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. स्टॅलिन हे चंद्राबाबू नायडू यांच्या संपर्कात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारणार असल्याचे संकेत दिले आहे.
राहुल गांधी यांनी देशाचे नेतृत्व केले पाहिजे
एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “इंडिया आघाडी खासकरुन कॉंग्रेस ज्या प्रकारे पुढे चालली आहे हे आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत. कॉंग्रेसने लोकसभा निवडणूकीमध्ये 100 चा आकडा जर पार केला तरी इंडिया आघाडीचा विजय झाला. कॉंग्रेस त्याहूनही पुढे जात आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुकीचे जे निकाल आहेत ते अतिशय चांगले आहेत. कॉग्रेस 150 च्या पुढे देखील जाऊ शकते. जर कॉंग्रेस 150 च्या पुढे गेली तर देशाचे चित्र बदलणार आहे. कॉंग्रेस सगळ्यात मोठी पार्टी आहे. तर पंतप्रधान त्यांचा असेल. हीच देशाची इच्छा आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी संघर्ष केला आहे त्यामुळे राहुल गांधी यांनी देशाचे नेतृत्व केले पाहिजे,” असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी मांडले आहे.
शिवसेना के फायरब्रांड नेता @rautsanjay61 बोले : राहुल गांधी @RahulGandhi अगले पीएम pic.twitter.com/HxQSJW03dn
— Ravish Kumar ᴾᵃʳᵒᵈʸ © (@SirRavishFC) June 4, 2024