
MP Sanjay Raut live press conference Target Mahayuti for the local body elections
Mumbai BMC Elections : मुंबई : राज्यामध्ये महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये 26 महापालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपली आहे. मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंनी युती केली आहे. दोन दशकानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. मराठी मते राखण्यासाठी हे बंधू एकत्र आले आहेत. मात्र यामध्ये उद्धव ठाकरे यांना जास्त जागा तर राज ठाकरे यांना कमी जागा देत अन्याय झाल्याचे म्हटले जात आहे. यावरुन भाजपने देखील निशाणा साधला. खासदार संजय राऊत यांनी सर्व आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारण आणि सध्याच्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मत मांडले आहे. यामध्ये राज ठाकरेंवर अन्याय झाल्याच्या टीकेवर देखील उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना 164 तर राज ठाकरेंची मनसे 53 जागांवर निवडणूक लढवत आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “राजकीय वर्तुळातील चर्चेला फार किमत द्यायची गरज नाही . राज ठाकरे काल मातोश्रीवर आले होते. कोवळा मिळाला म्हणून आले होते का? ते बाहेर हसत पडतानाचे फोटो तुम्ही काढलेत ना. आवळा-कोवळा ठरवणारे तुम्ही कोण? राजसाहेब यांच्या पक्षाच्या जागा जास्तीत जास्त जिंकून याव्यात अशी आमची भूमिका आहे. कारण त्यांच्या पक्षाने मनसेने उत्तम जागा जिंकल्या तर शिवसेनेने जिंकलेल्या जागांना किंमत आहे. तरच आम्ही बहुमताचा आकडा पार करु शकतो, असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : भाजप आमदार राहुल आवाडे ‘ॲटिव्ह’; तर सेनेचे खासदार धैर्यशील माने ‘गायब’
पुढे ते म्हणाले की, राजसाहेबांना मिळालेल्या जागांपैकी 80 टक्के जागा त्यांनी जिंकाव्यात. त्यासाठी आम्ही प्रयत्न करु. काल राज ठाकरे मातोश्रीवर आलेले तेव्हा शिवतीर्थ, नाशिक, कल्याण-डोंबिवली येथे संयुक्त सभा कशा घ्यायच्या यावर चर्चा झाली. संयुक्त जाहीरनामा प्रकाशन या संदर्भात चर्चा झाल्या” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : पुण्यासह संभाजीनगरमध्येही भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली; दोन्ही पक्ष आमनेसामने
शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये तिकीट मिळून देखील बंडखोरी झाली आहे. 9 ते 10 ठिकाणी बंडखोरी झालीय. त्यांना रोखणार कसं? या प्रश्नावर राऊत म्हणाले की, “ज्यांनी इतर पक्षांकडून उमेदवारी घेतलीय, त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत. ते 5-10 कोटीसाठी गेले आहेत. शिवसेना-मनसेची युती भक्कम आहे. मराठी माणूस बंडखोर म्हणवणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालणार नाही. जर कोणी शिंदे गटात किंवा अन्य पक्षात गेलं असेल, तर ते महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या पाठित खंजीर खुपसण्यासारखं आहे. तुम्हाला दीर्घकाळ पद दिलेली आहेत. पक्षाला वाटलं बदल केला पाहिजे, तर तुम्ही पक्षासोबत असलं पाहिजे” अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी बंडखोऱ्याबाबत घेतली आहे.