Photo Credit : Social Media
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र केडरच्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. यूपीएससी कोटाच्या बनावट कागदपत्रांमुळे त्या वादात सापडल्या आहेत. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर बुधवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने पूजा यांच्या अटकेला 29 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची विविध पातळ्यांवर चौकशी सुरु असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) कारवाई सुरु केली आहे. यूपीएससीकडून पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या वडिलांची शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याच्या आरोपाखाली चौकशी सुरु आहे. पूजा यांचे वडील फरार असून, त्यांच्या आईला शेतकऱ्यांना धमकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अशातच आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
सुनावणीत न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद म्हणाले की, कनिष्ठ न्यायालय पूजाविरुद्धच्या आरोपांमध्ये अडकले आणि याचिकेचा योग्य विचार केला नाही. वास्तविक, पटियाला हाऊस कोर्टाने एक ऑगस्ट रोजी पूजाला दिलासा देण्यास नकार दिला होता. आरोपींची कोठडीत चौकशी करणे आवश्यक असल्याचे कनिष्ठ न्यायालयाने म्हटले होते. यानंतर पूजाने ८ ऑगस्ट रोजी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी आणि गुंतलेल्या लोकांची चौकशी करण्यासाठी आरोपींची कोठडीत चौकशी आवश्यक आहे. सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जंगला यांनी दिल्ली पोलिसांना पूजाला यूपीएससीच्या कोणत्याही आतल्या व्यक्तीने मदत केली आहे का हे शोधण्यास सांगितले होते. मात्र, त्यांना फसवण्यात आल्याचे पूजा यांच्यामार्फत बचावात म्हटले होते.






