Independent MP Umesh Patel demands salary cut for MPs who do not perform parliamentary duties
Monsoon Session 2025 : नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन आता समाप्त झाले आहे. मात्र अधिवेशनामध्ये निर्णायक चर्चा होण्यापेक्षा जास्त खासदारांचा गदारोळ सुरु होता. यंदाचे पावसाळी अधिवेशन हे गोंधळ, राडा आणि आंदोलने यामुळे जास्त चर्चेत राहिले. करोडो रुपयांचा खर्च करुन अधिवेशन घेतले जाते, मात्र कामकाजाचे तास कमी होत तहकूब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर आता एका अपक्ष खासदाराने केलेल्या मागणीवरुन सर्वच खासदारांची झोप उडाली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या एका महिन्यात संसदेच्या कामकाजादरम्यान विरोधकांनी विविध मुद्द्यांवर गोंधळ घातला. या काळात, विशेषतः बिहारमधील एसआयआरचा मुद्दा, ऑपरेशन सिंदूर हे मुद्दे सभागृहात गाजले. संपूर्ण अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात एसआयआरवर चर्चा करण्याची मागणी करत राहिले. शेवटच्या दिवशी देखील संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. लोकसभेत चर्चेसाठी १२० तास देण्यात आले होते, परंतु केवळ ३७ तास चर्चेसाठी देण्यात आले. यातील बहुतेक चर्चा ऑपरेशन सिंदूरवर होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसद भवनामध्ये एका अपक्ष खासदाराने आंदोलन केले आहे. निदर्शने करत सभागृहातील कामकाजामध्ये व्यत्यय आणणाऱ्या खासदारांच्या पगारात कपात करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीमुळे फक्त विरोधी नाही तर सत्ताधारी खासदारांची देखील झोप उडाली आहे. संसदेमध्ये अपेक्षित काम न झाल्यास खासदारांच्या खिशातून पैसे कपात करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी एक राजकीय चर्चेचा विषय बनली आहे.
दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील अपक्ष खासदार उमेश पटेल यांनी गुरुवारी बॅनर घेऊन निषेध व्यक्त केला. सभागृहाचे कामकाज पूर्ण न करता, चर्चा करण्यासाठी खर्च झालेला पैसा खासदारांच्या पगारातून वसूल करावा अशी मागणी उमेश पटेल यांनी केली आहे. उमेश पटेल यांनी आणलेल्या बॅनरवर ‘माफी मागा, सत्ताधारी पक्ष आणि विरोधक माफी मागा’ असे लिहिले होते.
ही रक्कम जनतेने का भरावी
खासदार उमेश पटेल म्हणाले की, सरकारकडून माझी मागणी अशी आहे की जर सभागृह चालत नसेल तर खासदारांना पगार आणि इतर फायदे देऊ नका. या अधिवेशनासाठी सभागृहावर झालेला खर्चही खासदारांच्या खिशातून वसूल केला पाहिजे. जेव्हा सभागृह चालत नसेल तर त्यावर झालेल्या खर्चाची रक्कम जनतेने का भरावी, असा महत्त्वपूर्ण प्रश्न खासदार उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उमेश पटेल कोण आहेत?
उमेश पटेल हे दमण आणि दीवचे अपक्ष खासदार आहेत. निषेधासाठी त्यांनी घेतलेल्या बॅनरमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनाही देशातील जनतेची माफी मागण्याचे आवाहन करण्यात आले होते. उमेश पटेल यांनी हे बॅनर घेऊन संसद भवन परिसरात संपूर्ण अधिवेशनादरम्यान सभागृहात सुरू असलेल्या हळू आणि संथ गतीने सुरु असलेल्या कामकाजाचा निषेध केला.