India Alliance Vice Presidential election candidate former SC judge Justice B. Sudarshan Reddy
B. Sudarshan Reddy : नवी दिल्ली : देशामध्ये लवकरच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी अचानकपणे राजीनामा दिला. यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने यावेळी देखील धक्कातंत्र वापरत चर्चेत असणाऱ्या नावांपेक्षा दुसरेच नाव जाहीर केले. यानंतर आता इंडिया आघाडी देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे, इंडिया आघाडीकडून न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहे.
दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. . एकीकडे मतचोरीच्या आरोपांनी रान पेटले असून दुसरीकडे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या संदर्भात देशातील विरोधकांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये काल(दि.18) पार पडली. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडत आहे. उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे असणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर विरोधी पक्षांनी एकमताने सहमती दर्शविली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी कोण आहेत?
न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची २००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला. १९७१ मध्ये त्यांनी आंध्र प्रदेश बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली. रेड्डी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात रिट आणि दिवाणी खटल्यांमध्ये वकिली केली. १९८८-९० दरम्यान त्यांनी उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणूनही काम केले आहे.
न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी १९९० दरम्यान सहा महिने केंद्र सरकारचे अतिरिक्त स्थायी वकील म्हणूनही काम केले. २ मे १९९५ रोजी रेड्डी यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि २००५ मध्ये त्यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २००७ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि २०११ मध्ये ते निवृत्त झाले. आता त्यांना उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीने उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. २१ ऑगस्ट ही नामांकनाची शेवटची तारीख आहे. तर नामांकनांची छाननी 22 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ही 25 ऑगस्ट 2025 असणार आहे. तर 9 तारखेला मतदान झाल्यानंतर मतमोजणी करुन निकाल हाती येणार आहे. देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही जोरदार चर्चेचा विषय ठरली असून कोण हे पद मिळवणारे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.