
अभिमानास्पद! इस्राइल व अमेरिकेकडून Captain Smit Machharचा होणार नागरी शौर्य सन्मान
भारतातील इस्रायली दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून या निर्णयाची माहिती दिली. कॅप्टन मच्छार यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळण्यास मदत झाल्याचे दूतावासाने म्हटले आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष हर्झांग त्यांना हा पुरस्कार प्रदान करतील. तसेच, त्यांच्या लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी गुरुवारी कॅप्टन मच्छार यांच्या शौर्याची प्रशंसा करणारे निवेदन अमेरिकी काँग्रेसच्या अधिकृत नोंदीत समाविष्ट करण्याची घोषणा केली. इतर खासदारांनीही त्यांच्या धाडसाचा गौरव करावा, असे आवाहन त्यांनी केले.
30 सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या एफझेड 1073 या विमानात ही घटना घडली. उड्डाणादरम्यान सहवैमानिकाने कॅप्टन मच्छार यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
राजा कृष्णमूर्ती यांच्या निवेदनानुसार, या घटनेदरम्यान विमान अवघ्या 30 सेकंदांत सुमारे 16 हजार फूट खाली आले. गंभीर जखमी असूनही कॅप्टन मच्छार यांनी कॉकपिटच्या दरवाजापर्यंत पोहोचून तो उघडला. त्यामुळे विमानातील इतर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना कॉकपिटमध्ये प्रवेश करून हल्लेखोराला ताब्यात घेण्याची संधी मिळाली.
त्यानंतर विमानातील फ्लायदुबईच्या दोन राखीव पायलटांनी विमानाची सूत्रे हाती घेतली आणि सौदी अरेबियातील तबूक येथे विमान सुरक्षित उतरवले. या विमानात 172 प्रवासी होते. त्यामध्ये चार अमेरिकी नागरिक आणि २७ मुलांचाही समावेश होता.
कॅप्टन स्मित मच्छार यांना विमान उड्डाण संचालनाचा 17 वर्षांचा अनुभव असून, त्यापैकी 11 वर्षे त्यांनी कॅप्टन म्हणून काम केले आहे. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले, असे कृष्णमूर्ती यांनी नमूद केले.
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष सुरू असतानाही विमानातील सर्व प्रवाशांचे प्राण आपल्या पुढील कृतीवर अवलंबून असल्याची जाणीव कॅप्टन मच्छार यांना होती. त्यांच्या अनुभवामुळे आणि प्रसंगावधानामुळे इतरांना हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली, असे कृष्णमूर्ती यांनी सांगितले.
विमानातील प्रत्येक प्रवाशामागे एक कुटुंब आहे. कॅप्टन मच्छार यांनी हार न मानल्यामुळे प्रवासी आणि विमानातील कर्मचारी आपल्या प्रियजनांकडे सुरक्षित परतू शकले, अशा शब्दांत खासदार कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.