रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! IRCTCची देशभर धडक कारवाई; हजारो अनधिकृत पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ जप्त
IRCTC Food: रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ व पेय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने म्हणजेच IRCTCने विशेष तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. अनधिकृत खाद्यपदार्थ, पेये तसेच मंजुरी नसलेले पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर विकणाऱ्या आणि साठवून ठेवणाऱ्या केटरिंग युनिट्सवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या कारवाईचा उद्देश रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये आणि रेल्वेतील खानपान सेवांमध्ये निर्धारित अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि परवाना नियमांचे काटेकोर पालन व्हावे हा आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत IRCTCने Quick Response Teams (QRT) तयार केली आहेत. रेल्वेच्या व्यावसायिक विभागाच्या समन्वयाने ही पथके रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानके तसेच केटरिंग युनिट्सची अचानक तपासणी करत आहेत. तपासणीदरम्यान संबंधित केटरिंग युनिटकडे परवाना, आवश्यक अधिकृत परवानग्या, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि इतर निर्धारित निकषांची पूर्तता होत आहे की नाही, याची पाहणी केली जात आहे.
28 जुलै ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत लखनौ विभागात IRCTCच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या व्यावसायिक विभागासोबत विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान 117 रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मंजुरी नसलेल्या ब्रँडच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या 5,241 बाटल्या जप्त करण्यात आल्या.
चंदीगड विभागात अंबाला, लुधियाना, अमृतसर, कटरा आणि जम्मू यांसह विविध स्थानकांवर रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत 51 रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली आणि 3,108 अनधिकृत पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय, अंबाला येथे QRT पथकाने केलेल्या दोन अचानक तपासण्यांमध्ये आइसक्रीम आणि फ्लेवर्ड मिल्कसह अनधिकृत उत्पादनांची 13 कार्टन्स जप्त करण्यात आली. सहारनपूर रेल्वे स्थानकावरही अनधिकृत आइसक्रीम, पेये आणि पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर जप्त करण्यात आले.
9 ऑगस्ट रोजी साबरमती BG रेल्वे स्थानकावर ट्रेन साइड व्हेंडिंगच्या कारभाराची अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी ट्रेन क्रमांक 19223 आणि 19031 मध्ये अनधिकृत पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि ताक चढवले जात असल्याचे आढळून आले. IRCTCच्या पथकाने हे साहित्य जप्त करून पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले.
8 ऑगस्ट रोजी हावडा येथे QRT पथकाने रेल्वेच्या व्यावसायिक विभागासोबत अचानक तपासणी करून अनधिकृत खाद्यपदार्थ आणि पेये जप्त केली. संबंधित साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली. तर 8 ते 14 ऑगस्टदरम्यान गुवाहाटी, कामाख्या, अगरतळा, कटिहार, न्यू जलपाईगुडी आणि डिब्रुगड या भागांत नियमित, अचानक तसेच ऑनबोर्ड तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमध्ये अनधिकृत पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, खाद्यपदार्थ, जादा दर आकारणी, कर्मचाऱ्यांची कागदपत्रे, स्वच्छता, कीटक नियंत्रण, उपकरणे आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या दर्जावर विशेष लक्ष देण्यात आले. विविध ठिकाणी अनधिकृत पाणी आणि खाद्यपदार्थ जप्त करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
IRCTCने सर्व केटरिंग सेवा पुरवठादारांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणतेही अनधिकृत खाद्यपदार्थ किंवा पेये रेल्वेत चढवू नयेत, साठवू नयेत किंवा विकू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यास सांगितले आहे. निर्धारित नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित परवाना आणि कराराच्या अटींनुसार कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण अन्न व पेये मिळणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे IRCTCच्या सर्व झोन आणि विभागांमध्ये QRT पथके सक्रिय करण्यात आली आहेत. IRCTCकडून रेल्वेच्या संबंधित व्यावसायिक विभागांसोबत समन्वय साधून अशा तपासणी मोहिमा सातत्याने राबवल्या जाणार आहेत. अनधिकृत खाद्यपदार्थ आणि पेयांची विक्री रोखण्यासोबतच अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या निर्धारित मानकांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे.