IRCTC Japan Tour Package : जपानला भेट देण्याची संधी, आयआरसीटीसी (IRCTC) घेऊन आले आहे एक विशेष १०-दिवसांचे पॅकेज ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
अनेक भारतीय पर्यटकांच्या आणि प्रवासाची आवड असणाऱ्यांच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये (Bucket List) जपान या देशाचे स्थान अग्रक्रमाने असते. गगनचुंबी आधुनिक इमारती, अद्ययावत तंत्रज्ञान, अतिशय प्राचीन संस्कृती, शिस्तबद्ध जीवनशैली आणि चेरी ब्लॉसमच्या फुलांचे सौंदर्य यामुळे जपान जगभरातील पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. मात्र, पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी जपानमधील भाषेचा अडसर, स्थानिक वाहतूक व्यवस्था, खाण्यापिण्याच्या सोयी आणि योग्य नियोजनाचा अभाव यांमुळे प्रवास करणे थोडे आव्हानात्मक ठरते. पर्यटकांची हीच अडचण लक्षात घेऊन भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या ‘आयआरसीटीसी’ने (IRCTC) प्रवाशांसाठी एक अत्यंत आकर्षक, सुरक्षित आणि सर्व सोयींनी युक्त ‘IRCTC Japan Tour Package’ सादर केले आहे.
हे विशेष टूर पॅकेज १० दिवस आणि ९ रात्रींचे असून, ६ सप्टेंबर रोजी देशाची राजधानी नवी दिल्ली येथून या प्रवासाची सुरुवात होईल आणि १५ सप्टेंबर रोजी सहल पूर्ण करून प्रवासी परत येतील. परदेश प्रवासाची कोणतीही पूर्वकल्पना नसलेल्या किंवा भाषेची अडचण असलेल्या प्रवाशांसाठी हे पॅकेज अत्यंत सोयीचे ठरणार आहे, कारण संपूर्ण दौऱ्यात इंग्रजी बोलणारा गाईड आणि सुरक्षेची संपूर्ण काळजी IRCTC कडून घेतली जाणार आहे.
IRCTC ने प्रवाशांच्या बजेटचा विचार करून या पॅकेजची रचना केली आहे. सहलीच्या दरांची रचना खालीलप्रमाणे करण्यात आली आहे:
या पॅकेजमध्ये विमानाचे तिकीट, निवास, भोजन आणि स्थानिक प्रवास या सर्वांचा समावेश असल्याने प्रवाशांना वेगळा कोणताही मोठा खर्च करण्याची गरज भासणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Flight 2482 : अमेरिकेच्या आकाशात थरार! एकाच फ्लाइट नंबरची २ विमाने आली आमनेसामने; ATC मुळे टळला भीषण अपघात
आयआरसीटीसीच्या या आंतरराष्ट्रीय सहलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सेवा पुरवणे. या पॅकेजअंतर्गत दिल्ली ते जपान येण्या-जाण्याचे इकॉनॉमी क्लासचे विमान तिकीट दिले जाईल. जपानमध्ये उतरल्यानंतर प्रवाशांचा मुक्काम चार-तारांकित (4-Star Hotels) हॉटेल्समध्ये असेल.
याशिवाय, जपानचा टूरिस्ट व्हिसा शुल्क, रोजचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे स्वादिष्ट जेवण यांचा समावेश पॅकेजमध्येच आहे. विमानतळावरून हॉटेलमध्ये जाणे-येणे आणि सर्व प्रेक्षणीय स्थळे फिरण्यासाठी वातानुकूलित (AC) बसची सोय केली जाईल. तसेच, ७० वर्षांपेक्षा कमी वयाच्या सर्व प्रवाशांसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स (प्रवास विमा) आणि स्थानिक माहिती देण्यासाठी इंग्रजी बोलणारा अनुभवी गाईड संपूर्ण प्रवासात सोबत असेल.
सहलीची सुरुवात जपानची राजधानी टोकियो शहरापासून होईल. टोकियोमध्ये प्रवाशांना ऐतिहासिक असाकुसा मंदिर, खरेदीसाठी प्रसिद्ध असलेली नाकामिसे शॉपिंग स्ट्रीट, निसर्गरम्य उएनो पार्क, कृत्रिम बेट ओडाईबा आणि डिजिटल आर्टसाठी जगप्रसिद्ध असलेले ‘टीमलॅब प्लॅनेट्स’ (teamLab Planets) दाखवले जाईल. हवामान अनुकूल असल्यास प्रवाशांना जपानची ओळख असलेल्या ‘माउंट फुजी’च्या (Mount Fuji) ५ व्या स्टेशनवर नेले जाईल. जर हवामान खराब असेल तर त्याऐवजी ओशिनो हक्काई या पारंपरिक निसर्गरम्य गावाला भेट दिली जाईल.
यानंतर हाकोने (Hakone) भागात प्रवाशांना ओवाकुदानी व्हॅली, प्रसिद्ध हाकोने रोपेवे आणि आशी सरोवरातील ‘हाकोने पायरेट शिप क्रूझ’चा (Pirate Ship Cruise) मनमुराद आनंद घेता येईल. तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्यांसाठी टोयोटा संग्रहालय आणि हाय-स्पीड ट्रेनची माहिती देणाऱ्या ‘एससीमॅगलेव्ह रेल्वे संग्रहालयाची’ सफर आयोजित करण्यात आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
प्रवासाच्या पुढील टप्प्यात जपानची सांस्कृतिक राजधानी क्योटो येथील अराशियामा बांबू फॉरेस्ट, सुवर्ण मंदिर म्हणून ओळखले जाणारे किंकाकु-जी मंदिर आणि हजारो लाल रंगाच्या तोरी द्वारांसाठी प्रसिद्ध असलेले फुशिमी इनारी ताईशा मंदिर दाखवले जाईल. यानंतर ओसाका शहरात ऐतिहासिक ओसाका कॅसलची भ्रमंती आणि नारा (Nara) येथे मोकळेपणाने फिरणाऱ्या प्रसिद्ध हरणांचे दर्शन व तोडाई-जी मंदिराची भेट हा प्रवाशांसाठी एक अद्भुत अनुभव ठरेल.
या सहलीचा सर्वात भावूक आणि महत्त्वाचा भाग म्हणजे हिरोशिमा (Hiroshima) शहराची भेट! १९४५ मधील अणुबॉम्ब हल्ल्याची आठवण करून देणारे पीस मेमोरियल पार्क, मियाजिमा बेट आणि पाण्यावर तरंगणारे इत्सुकुशिमा मंदिर प्रवाशांना पाहता येईल. या प्रवासादरम्यान शिन-ओसाका ते हिरोशिमा दरम्यान प्रवाशांना जपानच्या अतिवेगवान ‘शिंकांसेन बुलेट ट्रेन’मधून (Shinkansen Bullet Train) प्रवास करण्याचा अविस्मरणीय अनुभव घेता येईल. जर तुम्हीही जपान फिरण्याचे स्वप्न पाहत असाल, तर IRCTC ची ही टूर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते.

