Maharashtra State Open : हर्षित महिमकरची दुहेरी मुकुटाला गवसणी! स्पृहा जोशी, अन्विषा घोरपडेही ठरल्या विजेत्या
Maharashtra State Open : बॉम्बे जिमखाना आयोजित योनेक्स सनराइज बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ग्रेटर मुंबईच्या हर्षित महिमकरने दुहेरी मुकुट पटकावत शानदार कामगिरी केली. पुरुष एकेरी आणि 19 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत विजेतेपद मिळवत त्याने स्पर्धेवर आपली छाप पाडली. मुलींच्या 19 वर्षांखालील गटात मुंबई उपनगरच्या स्पृहा जोशीने, तर 17 वर्षांखालील गटात अन्विषा घोरपडेने विजेतेपद मिळवले.
हर्षितकडून वेद भोईर पराभूत
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात तिसरे मानांकन असलेल्या हर्षितने ठाण्याच्या चौथ्या मानांकित वेद भोईरचा 15-6, 15- 3 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. त्यानंतर 19 वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम फेरीतही हर्षितने आपले वर्चस्व कायम राखले. अव्वल मानांकित हर्षितने पालघरच्या सहाव्या मानांकित ऋतुराज चिपटला 15-9, 15-5 असे पराभूत करत दुसरे विजेतेपद आपल्या नावावर केले.
मुलींच्या 19 वर्षांखालील एकेरीत मुंबई उपनगरच्या बिगरमानांकित स्पृहा जोशीने शानदार पुनरागमन केले. पहिला गेम गमावल्यानंतरही तिने संयम आणि जिद्द दाखवत ग्रेटर मुंबईच्या अन्विषा घोरपडेचा 12-15, 15-6, 16-14 असा पराभव केला. मात्र, अन्विषाने 17 वर्षांखालील मुलींच्या एकेरीत बाजी मारली. अंतिम सामन्यात तिने इमान मोटरवाला हिचा 15-9, 15-7 असा पराभव केला.
इतर गटांत 17 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अक्षत रायसुराणा, मुलींच्या दुहेरीत खुशी पहावा आणि युविका बजाज, मिश्र दुहेरीत सोहम फाटक आणि सिया सिंग यांनी विजेतेपद पटकावले. मुलांच्या 19 वर्षांखालील दुहेरीत निधीश मोरे आणि यश ढेंबरे, तर 17 वर्षांखालील दुहेरीत अक्षत रायसुराणा आणि विक्रांत नेगी यांनी बाजी मारली. पुरुष दुहेरीत विप्लव कुवळे आणि विराज कुवळे यांनी विजेतेपद मिळवले.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत अनेक उदयोन्मुख खेळाडू उदयास आले. जे पुढे जात देशासाठी उत्तुंग कामगिरी करण्यास सक्षम आहेत. ज्यात अनेक खेळाडूंचे नाव घेता येईल.
Ans: ग्रेटर मुंबईच्या हर्षित महिमकरने पुरुष एकेरी आणि 19 वर्षांखालील मुलांच्या एकेरीचे विजेतेपद मिळवले.
Ans: मुंबई उपनगरच्या स्पृहा जोशीने अन्विषा घोरपडेचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
Ans: बॉम्बे जिमखानाने योनेक्स सनराइजच्या सहयोगाने महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले होते.






