अहमदाबाद: गुजरात एटीएसने भारत-पाकिस्तान कच्छ सीमेवरून देशाच्या सुरक्षेशी धोका निर्माण करणाऱ्या एका गुप्तहेराला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव सहदेव सिंग गोहिल असून तो सीमा सुरक्षा दल (BSF) आणि भारतीय हवाई दलाशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. वृत्तसंस्था ANI च्या माहितीनुसार, गोहिल बराच काळ पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होता. अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी अहमदाबादला आणण्यात आले असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सीमावर्ती भागातील संवेदनशील माहिती सातत्याने पाकिस्तानकडे पाठवत होता. गुजरात सीमेवरून अशा प्रकारे हेरगिरी करताना व्यक्तीला अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही पोरबंदर परिसरात अशाच स्वरूपाचा गुप्तहेर पकडण्यात आला होता. या सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंता वाढली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरातून १२ ते १३ गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या बहुतांश आरोपींचे पाकिस्तानच्या आयएसआयसह इतर गुप्तचर संस्थांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे पाकिस्तानच्या गुप्तचर नेटवर्कचे पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे मत आहे.
‘इंदिरा गांधी बोलत आहेत, मला गोपनीय कामासाठी ६० लाख रुपये हवे आहेत’; देशाला हादरवून टाकणारा घोटाळा
२०२३ च्या मध्यात गोहिलचा अदिती भारद्वाजशी व्हॉट्सअॅपवर संपर्क झाला. त्या महिलेने गोहिलला कच्छ परिसरातील बीएसएफ व नौदलाच्या ठिकाणांची माहिती, फोटो व व्हिडिओ पाठवण्यास प्रवृत्त केले. पुढे, २०२५ च्या सुरुवातीला गोहिलने आपल्या आधार कार्डच्या मदतीने नवीन सिमकार्ड घेतले आणि भारद्वाजला दिले. या माध्यमातून संवेदनशील माहिती पाकिस्तानकडे पाठवली जात होती. या हेरगिरीच्या मोबदल्यात गोहिलला एका मध्यस्थामार्फत ₹४०,००० रोख रक्कमही देण्यात आली, असे एटीएसने स्पष्ट केले आहे.
१ मे रोजी एटीएसने तांत्रिक देखरेख आणि केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने गोहिलला ताब्यात घेतले आणि पुढे औपचारिक अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ६१ (गुन्हेगारी कट) आणि १४८ (सरकारविरुद्ध युद्ध छेडणे किंवा मदत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएसने जप्त केलेल्या मोबाईल फोनमधील अनेक फाइल्स आधीच हटवण्यात आल्याचे निदर्शनास आले असून, डेटा रिकव्हरीसाठी मोबाईल फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांत सीमावर्ती भागांतून अनेक गुप्तहेर अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षा यंत्रणांचे मत आहे की पाकिस्तानकडून भारतात पुन्हा हेरगिरीचे नेटवर्क सक्रीय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सखोल करण्यात येत असून, एटीएस लवकरच या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे