आंबेगाव तालुक्यातील 22 जण उत्तराखंडमध्ये अडकले, कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण
मंचर : मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने हाहाकार माजला. ही घटना दुपारी 1.45 ला घडली आणि सर्व होत्याचे नव्हते झाले. गंगोत्री पर्वतातून वाहणाऱ्या खीर गंगा नदीला मोठा पूर आला. वेगाने वाहणाऱ्या पाण्यासोबतच मोठा ढिगारा देखील आला आणि 34 मिनिटांमध्येच धराली गावात काहीच राहिले नाही. या घटनेत 4 जणांचा जीव गेला. तर या दुर्घटनेमध्ये आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील सुमारे २२ नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती समजली असून, हे सर्व पर्यटक मागील २४ तासांपासून संपर्कात नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे.
अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयाचे १९९० सालच्या १० वीच्या बॅचमधील महिला आणि पुरुष, असे एकूण २२ पर्यटक पर्यटनासाठी शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट रोजी उत्तराखंडला रवाना झाले होते. मंगळवार दिनांक ५ रोजी सकाळी या समूहातील काही जणांनी गंगोत्रीमधील फोटो आणि स्टेटस शेअर केले होते. मात्र दुपारी त्या परिसरात ढगफुटीची दुर्घटना घडल्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला आहे.
उत्तराखंडमधील धराली इथं ढगफुटीनंतर भीषण दुर्घटना घडली असून, माती आणि चिखलासह पाण्याचा मोठा प्रवाह पर्वतावरून खाली आला. यामुळे धराली गावातील हॉटेल्स, होम-स्टे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. यात चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, अवसरी खुर्द येथील या पर्यटकांची नेमकी माहिती उपलब्ध होत नसल्याने अवसरीमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
उत्तराखंड मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क
दरम्यान, अवसरी खुर्द येथील पर्यटकांना सुरुक्षित सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु असून उत्तराखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे, असे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.
मलब्यामध्ये कोणी नाही
दरम्यान, उत्तराखंड येथे मंगळवारी आलेल्या आपत्तीत मंचर येथील सुमारे १७ पर्यटक अडकले असल्याची माहिती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. सर्वांशी अद्याप संपर्क होऊ शकला नसून, ही माहिती मंत्रालयास पाठविण्यात आली आहे. निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले की, उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पर्यटक या मलब्यामध्ये कुठेही नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र मोठा पाऊस व अन्य गोष्टीमुळे यापैकी कोणाशीच संपर्क होऊ शकलेला नाही. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठविला असून, मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग हे सातत्याने उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून आहे. अद्याप या घटनेत या पर्यटकांपैकी कोण दगावले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून, ते सर्व सुखरूप असल्याची माहिती उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली असल्याचेही कदम यांनी सांगितले.