नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) हे भारतीय लष्कराचे पुढील लष्करप्रमुख असणार आहेत. याबाबतची नियुक्तीच केंद्र सरकारने जाहीर केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज सी. पांडे (Manoj C. Pande) यांच्या पदाचा कार्यकाळ या महिन्यातील 30 तारखेला संपणार आहे. त्यापूर्वीच ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यापूर्वी लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. पण, लष्करप्रमुख जनरल मनोज सी. पांडे हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळेच आता त्यांच्या जागी उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. नव्या लष्करप्रमुखांच्या सेवेचा कार्यकाळ 30 जून 2024 पासून सुरू होणार आहे. याबाबतचे निवदेनही जारी करण्यात आले.
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेदरम्यान विविध कमांड, कर्मचारी, निर्देशात्मक आणि परदेशी नियुक्त्यांमध्ये विशेष असे काम केले आहे. त्यांच्या या दीर्घ सेवेनंतर आता त्यांची भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.
कोण आहेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी?
उपेंद्र द्विवेदी यांचा जन्म 1 जुलै 1964 रोजी झाला. डिसेंबर 1984 मध्ये ते लष्करात नियुक्त झाले. उपेंद्र द्विवेदी यांचे प्राथमिक शिक्षण सैनिकी स्कूल, रेवा येथे झाले. यानंतर त्यांनी नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि यूएस आर्मी वॉर कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यांनी डीएसएससी वेलिंग्टन आणि आर्मी वॉर कॉलेज महू येथून अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.
विविध पदांवर नियुक्ती
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना लष्करात सुमारे 40 वर्षांचा अनुभव आहे. 15 डिसेंबर 1984 रोजी भारतीय लष्कराच्या जम्मू-काश्मीर रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या पदाच्या कार्यकाळात अनेक पदे भूषवली आहेत. त्यामुळे आता त्यांची लष्करप्रमुखपदावर नियुक्ती केली जात आहे.






