पंजाबमधील (Panjab) लुधियानामध्ये (Ludhiana) 8.49 कोटींच्या दरोड्याप्रकरणी पोलीस (Police) आणि काउंटर इंटेलिजन्स विंगला मोठे यश मिळाले आहे. डकैत हसिना मनदीप कौर आणि तिचा पती जसविंदर सिंग यांना उत्तराखंडमधून अटक करण्यात आली आहे. 100 तासांत या प्रकरणाची उकल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 5 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आता या दरोड्याचा मास्टरमाईंडही पोलिसांनी पकडला आहे. लुधियानाचे पोलीस आयुक्त मनदीप संधू यांनी ही माहिती दिली आहे.
कॅश व्हॅनमधील रोकड घेऊन दरोडेखोर पळून गेले
शुक्रवार, 9 जून रोजी मध्यरात्री 8 ते 10 दरोडेखोर लुधियानाच्या राजगुरु नगरमधील एटीएममध्ये रोख रक्कम जमा करणाऱ्या सीएमएसच्या कार्यालयात पोहोचले होते. शस्त्रांच्या बळावर त्यांनी सुरक्षा कर्मचारी आणि तैनात असलेल्या उर्वरित कर्मचाऱ्यांना एका खोलीत कोंडले आणि त्यांचे मोबाइलही फोडले. यानंतर सीएमएस कार्यालयात बसवण्यात आलेल्या सेन्सरच्या ताराही कापण्यात आल्या. त्यानंतर सीएमएस कार्यालयात ठेवलेल्या व्हॅनमध्ये सुमारे 8.49 कोटींची रोकड टाकून दरोडेखोर पळून गेले.
मुल्लापूर डाखा येथून कॅश व्हॅन सापडली
लुधियानाच्या मुल्लापूर दाखा येथून दुसऱ्या दिवशी सीएमएस कार्यालयातून चोरीला गेलेली कॅश व्हॅन पोलिसांनी जप्त केली. मात्र त्यावेळी या कॅश व्हॅनमध्ये रोख रक्कम नव्हती. या घटनेनंतर पोलिसांनी तपास करून 60 तासांत दरोड्याच्या योजनेत सहभागी असलेल्या 5 आरोपींना अटक केली. पंजाब पोलिसांचे डीजीपी गौरव यादव यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली होती. 5 आरोपींना अटक केल्यानंतर लुधियाना दरोड्याचा संबंध बर्नाला शहराशी असल्याचे पोलिसांना समजले. या दरोड्याची मुख्य सूत्रधार बरनाळा येथील मनदीप कौर आहे.