देशभरात लोकसभा निवडणुकीचे सात टप्पे संपल्यानंतर आज मतमोजणी सुरू आहे. अशात मध्य प्रदेशातील इंदूरची जागा एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर मतदारसंघात 2.18 लाख मतदारांनी NOTA पर्याय निवडला, जो एक नवीन विक्रम आहे. एकूण मतदारांपैकी 14.01 टक्के मतदारांनी NOTA चा पर्याय निवडला. यापूर्वी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, बिहारच्या गोपालगंज भागातील 51,660 मतदारांनी (पाच टक्के) NOTA पर्याय निवडून विक्रम केला होता.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सप्टेंबर 2013 मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ‘NOTA’ बटण समाविष्ट करण्यात आले होते. निवडणूक आयोगानुसार, एकूण मतदारांपैकी 4.62 लाख (0.99 टक्के) मतदारांनी NOTA ची निवड केली. यापूर्वी, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 61,31,33,300 मतांपैकी NOTA ला 65,14,558 (1.06 टक्के) मते मिळाली होती. त्याचप्रमाणे, 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या 55,38,02,946 मतांपैकी 60,02,942 (1.08 टक्के) मते NOTA साठी होती.
NOTA म्हणजे काय?
NOTA म्हणजे ( None Of The Above) वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नाही असं मत देता येतं.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील NOTA मतदारांनी 65 लाख 22 हजार 772 मते दिली होती, जी देशातील एकूण वैध मतांच्या 1.06 टक्के होती. देशात NOTA वापरण्यात बिहार आघाडीवर आहे. बिहारमध्ये 8 लाख 16 हजार 950 मतदारांनी NOTA ला मतदान केले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत NOTA ला राज्यात आणि देशात कमी मते मिळाली आहेत, यावरून मतदार त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करण्यास प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होते. तो कुठेही मतदान करत असला तरी त्याने आपल्या मताचा वापर केला पाहिजे. मतदान हा आपला मुलभूत अधिकार आहे. इंदूरमध्ये दोन लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. NOTA ला सर्वाधिक मतांचा विक्रम बिहारच्या गोपालगंज जागेचा आहे. येथे NOTA ला 51 हजार 660 मते मिळाली. NOTA ला पश्चिम चंपारणमध्ये 45,609 मतांसह दुसरे स्थान मिळाले.






