Madhya Pradesh PWD Chief Engineer Officer issued a government notice for Satyanarayan Puja viral news
भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये एक अजब घटना घडली आहे. एका अधिकाऱ्याने चक्क आपल्या सत्यनारायण पुजेसाठी आणि त्यानंतर असणाऱ्या महाप्रसादासाठी थेट नोटीस काढली. अधिकृत नोटीस काढल्यामुळे याचा फोटो देखील समोर आला आहे. ही बाब हास्यास्पद वाटत असली तरी मध्यप्रदेश सरकारच्या कारभारातील भोंगळ कारभार यामुळे समोर आला आहे.
भोपाळ प्रदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) मुख्य अभियंत्यांने ही मोठी चूक केली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भगवान सत्यनारायणाची कथा आणि महाप्रसाद आयोजित करण्यासाठी एका अनोख्या पद्धतीने निमंत्रण पाठवले. याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. सत्यनारायणाच्या पूजेसाठी आणि महाप्रसादासाठी सरकारी नोटीस काढण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सरकार नोटशीटनुसार, ५ सप्टेंबर रोजी मुख्य अभियंता संजय मस्के यांच्या अधिकृत बंगल्यावर सत्यनारायण कथा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नोटशीटमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी मुख्य अभियंता यांच्या अधिकृत बंगल्यावर आयोजित करण्यात आला होता. व्हायरल नोटशीटमुळे, मुख्य अभियंता विभागात चर्चेचा विषय बनला आहे.
मध्य प्रदेश पीडब्ल्यूडी मुख्य अभियंता अधिकाऱ्याने सत्यनारायण पूजेसाठी सरकारी नोटीस काढली (फोटो – सोशल मीडिया)
त्या अधिकृत नोटशीटमध्ये स्पष्ट भाषेत लिहिले होते, “भोपाळ झोन सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळविण्यात येते की, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सत्यनारायण कथेनंतर अधोस्वाक्षरीकृत, क्रमांक सीपीसी-१ चार इमली भोपाळ यांच्या अधिकृत निवासस्थानी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे कळविण्यात येते.” असे या सरकारी नोटीसमधून कळवण्यात आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उत्तर भारतावर निसर्गाचा कोप
उत्तर भारतात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूर आणि भूस्खलन झाले आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भूस्खलनाचा धोका आहे, तर पंजाब आणि हरियाणामधील अनेक गावे पाण्यात बुडाली आहेत. हरियाणातील बहादूरगड येथील मारुती कंपनीच्या स्टॉक यार्डमध्ये शेकडो वाहने पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. लष्कर आणि एनडीआरएफच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे, अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील सोमनाग येथेही ढगफुटीची घटना घडली आहे. पंजाबमध्ये पुरामुळे कहर सुरूच आहे, २३ जिल्हे प्रभावित झाले आहेत आणि ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ सप्टेंबर रोजी पंजाबच्या पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.