पंतप्रधानांच्या दौऱ्याआधीच मणिपूर पेटले; अनेक ठिकाणचे पोस्टर्स बॅनरही फाडले
इम्फाळ : मणिपूरमध्ये मागील वर्षी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याचे पाहिला मिळाले होते. या हिंसाचाराने संपूर्ण राज्य अशांत झाले होते. त्यानंतर येथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसत असतानाच आता पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वी राज्यात पुन्हा हिंसाचार उफाळला.
मणिपूरच्या चुराचंदपूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर आणि बॅनर अतिरेक्यांनी फाडले, बॅरिकेड्स पाडले आणि त्यांना आग लावली. ही घटना चुराचंदपूर पोलिस ठाण्यापासून सुमारे 5 किमी अंतरावर असलेल्या पिसोनामुन गावात घडली. सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना हाकलून लावले. लाठीचार्जही करण्यात आला. मणिपूरचे एकमेव राज्यसभा खासदार लेशेम्बा सानाजाओबा यांनी पंतप्रधानांच्या भेटीला राज्यासाठी खूप महत्त्वाचे म्हटले. यातून अनेक सकारात्मक बदल दिसून येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पंतप्रधान मोदी मणिपूरला 8500 कोटी रुपयांची भेट देणार आहेत. चुराचंदपूरमधील पीस ग्राउंडवरून मोदी 7300 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. हा भाग कुकीबहुल आहे. यासोबतच पंतप्रधान मैतेई बहुल क्षेत्र असलेल्या इम्फाळ येथून 1200 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन देखील करतील.
हिंसाचारानंतरचा पहिलाच दौरा
मणिपूर हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे. मे 2023 मध्ये मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाला. आतापर्यंत या हिंसाचारात २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो बेघर झाले आहेत. १३ फेब्रुवारीपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे.
पीएम मोदी आज देणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मणिपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी लोकांच्या अडचणी ऐकतील. मणिपूरला यापूर्वी हिंसक संघर्षांचा इतिहास आहे. यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी राज्याला भेट देऊन अशा वेळी लोकांचे म्हणणे ऐकले नाही. इतक्या कठीण काळात येथे येणारे मोदी हे पहिले पंतप्रधान असतील, असे सांगण्यात येत आहे.
हेदेखील वाचा : Uttarakhand Disaster : पंतप्रधान मोदी आज उत्तराखंड दौऱ्यावर; पुनर्वसनासाठी केंद्राकडून मोठ्या मदतीचे संकेत