
इम्फाळ : मणिपूरमध्ये घुसखोरी करून येथील सामाजिक व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आम्ही मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही. ही लढाई तुकडे करणारे विरुद्ध एकत्र ठेवणारे यांच्यातील आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूर येथे केला.
मणिपूरमधील वांशिक हिंसाचारावरून विरोधी पक्ष भाजपवर टीका करत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांची सभा झाली. मणिपूरमध्ये शांतता कायम ठेवण्याचा निश्चय व्यक्त करताना शहा म्हणाले, मणिपूरमध्ये घुसखोरीचे अनेक प्रयत्न होत आहेत. याद्वारे येथील सामाजिक रचना बदलण्याचा डाव आहे. मात्र, अशा लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही.
सर्व समुदायांना विश्वासात घेऊन आणि राज्याचे तुकडे होऊ न देता मणिपूरमध्ये शांतता कायम राखणे, यालाच मोदी सरकारचे प्राधान्य आहे. आमचे मुख्यमंत्री बीरेन सिंह हे मोदींकडे कायम मागणी करत असतात. आंतरसीमा परवाना असल्याशिवाय मणिपूर एकसंध राहू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हा परवाना भाजपने मणिपूरला ताकद दिली आहे.
वांशिक संघर्षावरही भाष्य
मणिपूरमध्ये मागील वर्षी झालेल्या वांशिक संघर्षावरही अमित शाहा यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ईशान्य भारताचे नशीब बदलेल तेव्हाच भारताचे नशीब बदलेल. मी संघर्षाबद्दल संसदेतही बोललो आहे. हा संघर्ष मिटविण्यासाठी आम्ही हरप्रकारे प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांचाच परिणाम म्हणून परिस्थितीत सुधारणा होत आहे.