
अमित शाह यांचा राहुल गांधींना सणसणीत टोला (Photo Credit- X)
राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रश्नाला शहांचे उत्तर
अमित शाह यांनी राहुल गांधींसोबत झालेल्या एका संवादाचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “राहुल गांधींनी मला एकदा विचारले की, आम्ही नेहमी निवडणूक का हरतो? त्यावर मी त्यांना सांगितले की, जोपर्यंत तुम्ही दोन गोष्टी समजून घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला पराभवाचे कारण कळणार नाही. मोदी सरकारने १९७३ पासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावले, तेही कोणत्याही आंदोलनाशिवाय. जनतेला जे हवंय, त्यालाच तुम्ही विरोध करता.”
काँग्रेसच्या विरोधाची लांबलचक यादी
काँग्रेसने मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला केवळ विरोधासाठी विरोध केला, असा आरोप शाह यांनी केला. ते म्हणाले: आम्ही राम मंदिर बांधले, तुम्ही विरोध केला. आम्ही कलम ३७० हटवले, तुम्ही विरोध केला. आम्ही सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केली, तुम्ही पुरावे मागितले आणि विरोध केला. तीन तलाक रद्द केला, यूसीसी (UCC) आणले, तरीही तुमचा विरोधच आहे. जर तुम्ही जनतेच्या पसंतीच्या कामांना विरोध करत असाल, तर तुम्हाला मतं कुठून मिळणार?” असा टोला त्यांनी लगावला.
२०२९ मध्ये पुन्हा मोदी सरकार; बंगाल-तामिळनाडूतही काँग्रेस हरणार!
राहुल गांधींना उद्देशून शाह म्हणाले, “राहुल बाबा, आताच हार मानून थकले असाल तर कसं होणार? अजून तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्येही तुमचा पराभव होणं निश्चित आहे. २०२९ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचेच सरकार स्थापन होईल.” ज्यांना स्वतःचा पक्ष समजावू शकत नाही, त्यांना विरोधक काय समजावणार, अशी चपराकही त्यांनी लगावली.
आरोग्य क्षेत्रातील बदलांवर भाष्य
IMA च्या कार्यक्रमात शाह यांनी गेल्या ११ वर्षांतील आरोग्य व्यवस्थेवर प्रकाश टाकला. “आम्ही केवळ रुग्णालये बांधली नाहीत, तर स्वच्छ भारत मिशन, फिट इंडिया, खेलो इंडिया आणि योगाच्या माध्यमातून एक संपूर्ण ‘हेल्थ इकोसिस्टम’ तयार केली आहे. घरोघरी शौचालय पोहोचवल्यामुळे अनेक आजार मुळापासून संपवण्यास मदत झाली आहे,” असे शाह यांनी नमूद केले.