
Delhi Bomb Blast प्रकरणातील मोठी बातमी! NIA आता तपास करणार; डॉ. शाहीन शाहीदलाही अटक
Delhi Bomb Blast News In Marathi : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळच्या वेळेत धावत्या कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटानंतर, राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवारी UAPA अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आणि राष्ट्रीय राजधानीत अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. याचदरम्यान लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेल्या कारच्या चालकाचा फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंध असल्याचा आरोप आहे. स्फोटानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी (११ नोव्हेंबर) एक उच्चस्तरीय बैठक घेतली.
दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आता सोमवारी संध्याकाळी राष्ट्रीय राजधानीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाची चौकशी करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला असून दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. ज्यामध्ये एनआयएकडून स्फोटाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या, तपास संस्था स्फोटाच्या ठिकाणाहून सुगावा गोळा करत आहेत. हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्याचे मुख्य कारण स्फोट आणि अनेक राज्यांमधील संबंध असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक तपन डेका, दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक सदानंद वसंत दाते उपस्थित होते, तर जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक (डीजीपी) नलिन प्रभात व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले होते.
दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा आणि स्फोटक कायद्यांतर्गत दहशतवादी हल्ल्यांसाठी कट रचणे आणि शिक्षेशी संबंधित कलमांखाली या प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे. त्यांनी राष्ट्रीय राजधानीत अनेक ठिकाणी छापेही टाकले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेल्या कारचा चालक फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित असल्याचा आरोप आहे.
फरीदाबादच्या कारवाईत एका महिला डॉक्टरलाही अटक करण्यात आली, जिचे नाव शाहीन शाहीद असं आहे. शाहीनचे दहशतवादी संघटना जैशसोबत कनेक्शन तपासात पुढे आले आहेत. या कारवाईत जैश ए मोहम्मद आणि अंसार गजवत उल हिंदशी निगडित पांढरपेशी दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला गेला. अटकेतील डॉक्टर शाहीन हिचे थेट जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचा खुलासा समोर आला आहे.
राष्ट्रीय राजधानी सध्या हाय अलर्टवर आहे आणि विमानतळ, रेल्वे स्थानके आणि बस टर्मिनल्सवर कडक दक्षता ठेवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामाचा रहिवासी आणि व्यवसायाने डॉक्टर उमर मोहम्मद लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील पार्किंग क्षेत्रात स्फोटात वापरलेली हुंडई आय२० कार चालवत होता.
लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेल्या कार चालवणाऱ्या व्यक्तीचा पहिला फोटो परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला आहे. या व्यक्तीचा फरिदाबादमधील एका दहशतवादी मॉड्यूलशी संबंध असल्याचा आरोप आहे जिथून स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता, अशी माहिती मिळत आहे.
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि डेटोनेटरचा वापर करण्यात आला असावा, ज्यामध्ये किमान नऊ जणांचा मृत्यू झाला होता. पोलिस सूत्रांनी सांगितले की, प्राथमिक तपासात दिल्ली स्फोट आणि फरिदाबादमधील दहशतवादी मॉड्यूल यांच्यात संभाव्य संबंध असल्याचे दिसून येते जिथून ३६० किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. “अंतिम अहवालाची वाट पाहत आहे,” असे सूत्रांनी सांगितले.
सोमवारी संध्याकाळी राष्ट्रीय राजधानीत झालेल्या स्फोटात किमान १० जण ठार झाले आणि २४ जण जखमी झाले. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कार हळूहळू चालत होती आणि लाल किल्ला परिसरातील एका ट्रॅफिक सिग्नलवर थांबली तेव्हा स्फोट झाला, ज्यामुळे जवळच्या अनेक वाहनांना आग लागली.