नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २१ मार्चपर्यंत भारतातून ७०.३४ लाख टन गव्हाची निर्यात झाली आहे. यापैकी सर्वाधिक गव्हाची निर्यात ही बांगलादेशात झाली आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी शुक्रवारी राज्यसभेत याबाबतची माहिती दिली.
पटेल नेमकं काय म्हणाल्या?
राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात पटेल यांनी सांगितले की, मागील आर्थिक वर्षातील निर्यातीपैकी सर्वाधिक ३९.३७ लाख टन गव्हाची निर्यात ही बांगलादेशात झाली आहे. तर श्रीलंका आणि युएईला अनुक्रमे ५.८० आणि ४.६९ लाख टन निर्यात झाली आहे. त्यापाठोपाठ इंडोनेशियाला ३.६८ लाख टन आणि फिलिपिन्समध्ये ३.५७ लाख टनांची निर्यात झाली आहे.
दरम्यान रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गव्हाची निर्यातीवर झाला आहे. हे दोन्ही देश गव्हाचे प्रमुख निर्यातदार आहेत. गव्हाच्या जागतिक व्यापारात दोन्ही देशांचा वाटा तब्बल २५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे पटेल यांनी यावेळी सांगितले.
“गव्हाची निर्यात वाढविण्याची भारताला संधी आहे. परकीय व्यापार धोरणानुसार, गव्हाची निर्यात ही मुक्त श्रेणी अंतर्गत असल्यामुळे निर्यातीसाठी कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही. गव्हाची वाढती जागतिक मागणी लक्षात घेत भारतीय निर्यातदारांनी गव्हाची निर्यात केली आहे” असेही पटेल यांनी यावेळी सांगितले.
[read_also content=”कारखाने संपूर्ण उसाचं गाळप पार पाडतील; साखर आयुक्तांनी किसान सभेला दिले आश्वासन https://www.navarashtra.com/maharashtra/factories-will-crush-the-entire-sugarcane-sugar-commissioner-assures-kisan-sabha-nrdm-262857.html”]
भारतीय दूतावासाच्या पुढाकारातून गहू निर्यातीसाठीही इंडोनेशिया, येमेन प्रजासत्ताक, अफगाणिस्तान, कतार, ओमान, भूतान आणि फिलीपिन्समधील नवीन संभाव्य बाजारपेठांची चाचपणी करण्यात आल्याचे पटेल म्हणाल्या.