बलुच लिबरेशन आर्मी (BLA) या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेस या रेल्वेचे अपहरण करून अनेक प्रवाशांना ओलीस धरले आहे. हा हल्ला बलुचिस्तानमधील बोलानच्या डोंगराळ भागात झाला असून, ओलिसांची सुटका करण्यासाठी सुरक्षा दलांकडून व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेवरून पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊयात.
११ मार्च रोजी क्वेटाहून पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस बोलानच्या डोंगराळ भागातील एका बोगद्यातून जात असताना आठ सशस्त्र दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. त्यानंतर ही ट्रेन हायजॅक केली. या घटनेवर पाकिस्तानने भारताविरुद्ध पुन्हा एकदा आरोपांचे सत्र सुरू केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी ट्रेन हायजॅकमध्ये भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
बलुच बंडखोरांनी नागरिक, महिला आणि मुलांना सोडले. तर पाकिस्तानी लष्कराचे कर्मचारी, गुप्तचर संस्थेचे अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आहे. बंडखोरांनी 214 जणांना ओलिस ठेवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी बलुचिस्तानमधील रेल्वे अपहरण घटनेबाबत भारतावर निराधार आरोप केले आहेत.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी पाकिस्तानमधील एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी या हल्ल्याच्या पाठीमागे भारताचा हात असून भारत अफगणिस्तानच्या मदतीने या हल्ल्यांना मदत करत आहे, असा आरोप त्यांनी केला. राणा सनाउल्लाह यांनी थेट आरोप करत म्हटले की, हे सर्व भारताचे षडयंत्र आहे. त्यांनी असा दावाही केला की बलुच बंडखोरांना अफगाणिस्तानात सुरक्षित आश्रय मिळत आहे.
ओलिसांच्या कुटुंबीयांच्या व्यथा
हल्ल्यानंतर अपहरण झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. एका पीडित कुटुंबाने माध्यमांसमोर आपली वेदना व्यक्त करताना सांगितले की, “आमच्या चुलत भावाच्या वडिलांनी सकाळी आठ वाजता ट्रेनमधून फोन करून ते घरी परतत असल्याचे सांगितले होते. मात्र, रात्री अकरा वाजता त्यांचा शेवटचा कॉल आला आणि त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही.”
बीएलएने हल्ल्याची जबाबदारी घेतली
बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संघटना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत असून, यापूर्वीही त्यांनी पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. बीएलएच्या दहशतवाद्यांनी नोव्हेंबर महिन्यात क्वेटा रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट घडवून आणला होता, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता.