नवी दिल्ली: पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भारत सरकारने काही महत्वाची पावले उचलली आहे. भारताने सिंधु जल करार स्थगित केला आहे. पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. वाघा बॉर्डर बंद केली आहे. तर पाकिस्तानने देखील भारताच्या निर्णयांची कॉपी केल्याचे दिसून येत आहे.
भारताने काही महत्वाची पावले उचलल्यानंतर आज पाकिस्तान सरकारने देखील महत्वाची बैठक घेतली. भारतासाठी पाकिस्तानने हवाई बंदी केली आहे. व्यापार बंद केला आहे. आजच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते आहे. पाकिस्तानी पीएमओच्या निवेदनात सांगण्यात आले की, पाकिस्तान भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याच्या अधिकाराचा वापर करेल. ज्यामध्ये शिमला कराराचा समावेश आहे. पाकिस्तानने भारतावर पाकिस्तानात दहशतवाद पसरवण्याचा आरोप केला.
सिंधु जल करार तोडणे म्हणजे युद्धाची घोषणा
सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या घोषणेला पाकिस्तान पूर्णपणे नकार देतो. पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे की हा करार एक बंधनकारक आंतरराष्ट्रीय करार आहे, ज्यामध्ये एकतर्फी स्थगिती आणण्याची कोणतीही तरतूद नाही. सिंधू जल करारांतर्गत पाण्याचा प्रवाह रोखण्याचा किंवा वळवण्याचा प्रकार म्हणजेच पाकिस्तानच्या हक्कांचे उल्लंघन करण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाचा गुन्हा मानला जाईल, असा इशारा पाकिस्तानने भारताला दिला आहे.
‘सिंधु जल’ कराराला दिली स्थगिती
भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या आहेत. भारताने भारत-पाकिस्तान सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच १ मे पर्यंत वाघा बॉर्डर बंद राहणार आहे. तसेच भारतामधील पाकिस्तानचे उच्चयुक्तालय बंद करण्यात येणार आहे. पाकिस्तानी नागरिकांना या पुढे भारताचा व्हिसा मिळणार नाही. जे नागरिक व्हिसा घेऊन भारतात राहिले आहेत त्यांना ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Big Breaking: पहलगाम हल्ल्यावरून भारताने आवळल्या पाकच्या नाड्या; ‘सिंधु जल’ कराराला दिली स्थगिती
सरकारने घेतलेले नेमके निर्णय काय?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भारत सरकार आक्रमक झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीसीएसची अत्यंत महत्वाची बैठक घेतली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. भारताने १ मे पर्यन्त अटारी वाघा बॉर्डर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.