महिला बुरखा घालून मतदान करू शकतील का? निवडणूक आयोगाने घेतला महत्त्वाचा निर्णय (फोटो सौजन्य-X)
Bihar Election 2025 News Marathi : बिहार विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीचा तारखा जाहीर करण्यात आल्या. बिहारमध्ये निवडणुका दोन टप्प्यात होतील. ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. २४३ सदस्यांच्या राज्य विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. मागील २०२० च्या विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात पार पडल्या होत्या, ज्यामध्ये ५६.९३ टक्के मतदान झाले होते. याचदरम्यान, नेहमीप्रमाणे चर्चेचा मुद्दा असलेल्या बुरख्यात मतदान करणाऱ्या महिलांचे काय होईल?
बुरखा काढून महिलांची पडताळणी केली जाईल का? यापूर्वी, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये या मुद्द्यावरून गोंधळ उडाला आहे. कधीकधी ओळखीबद्दलच्या संशयामुळे, तर कधीकधी राजकीय पक्षांच्या गोंधळामुळे. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले. पण यावेळी, निवडणूक आयोगाने असा उपाय शोधला आहे ज्यामुळे गोंधळ होणार नाही आणि मतदानात अडथळा येणार नाही.
मागील निवडणुकांमध्ये काय घडले हे आपणा सर्वांना माहितीय. बुरख्यात महिला मतदान केंद्रांवर पोहोचायच्या आणि तिथे कर्तव्यावर असलेले लोक किंवा विरोधी पक्षाचे एजंट दुसऱ्या कोणीतरी मतदान करत असल्याचा संशय व्यक्त करायचे. २०२२ मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीदरम्यान, गोंधळ इतका वाढला की अनेक ठिकाणी मतदान थांबवण्यात आले. २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्येही असाच एक प्रकार पाहायला मिळाला होता, जिथे तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला होता. दिल्लीतील काही भागातही हा मुद्दा चर्चेत आला होता, जिथे लोकांनी ओळख पडताळणीशिवाय मतदान कसे होऊ शकते असा प्रश्न उपस्थित केला होता. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती, परंतु त्यांची अंमलबजावणी करणे कठीण ठरले.
परिणामी महिलांच्या मतदानाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते आणि कधीकधी त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन झाले होते. पण यावेळी, निवडणूक आयोगाने यावर उपाय शोधला आहे. त्यांनी एक स्मार्ट उपाय शोधून काढला आहे. बिहार निवडणुकीच्या घोषणेच्या वेळी निवडणूक आयुक्तांना याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की प्रत्येक बूथवर अंगणवाडी सेविका तैनात केल्या जातील. या महिला स्थानिक पातळीवर प्रसिद्ध असतील. त्यांची जबाबदारी बुरखा परिधान करणाऱ्या महिलांची ओळख पडताळण्याची असेल. परंतु जर कोणत्याही महिलेवर संशय आला तर या महिला निश्चितच त्यांचा बुरखा काढून चौकशी करतील.
नियमानुसार उमेदवाराला कोणत्याही प्रकारची शंका असल्यास तो निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतो. तसेच नियमानुसार, मतदान केंद्रावर अशी तपासणी करण्याचा अधिकार निवडणूक अधिकारी किंवा पोलिंग एजंटला आहे. उमेदवार असा तपास करू शकत नाही.