जयपूर : राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यात एका महिलेवर दोन जणांनी सामूहिक अत्याचार (Gang Rape in Rajasthan) केल्याची घटना उघडकीस आली. आरोपींनी अत्याचारानंतर महिलेला मारहाणही केली आणि तिचे कपडे घेऊन पळून गेले, अशी माहिती पोलिसांनी सांगितले. एका स्थानिक व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली होती की, एक महिला विवस्त्र आहे आणि ती लोकांकडे मदत मागत आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि महिलेला पोलिस ठाण्यात नेले.
पीडित महिलेने सांगितले की, तिला दोन आरोपींपैकी एकाने फोन करून घराबाहेर बोलावले. तेथून तिला आमली रोडवरील एका निर्जन घरात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, 25 वर्षीय महिला दोन पुरुषांसोबत स्वेच्छेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी गेली होती. त्यांनी तिला रात्रभर राहण्याचा आग्रह धरल्याने वाद झाला. महिलेला घरी जायचे होते. परंतु, दोघांनी तिच्यावर राहण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर ती विवस्त्र अवस्थेत घरातून पळून आली आणि रस्त्याने जाणाऱ्या लोकांना मदत मागितली.
महिलेने सुरुवातीला सांगितले की, जर या घटनेबाबत तिच्या पतीला कळले तर तो तिला सोडून देईल, अशी भीती तिला वाटत होती. मूळची ओडिशाची रहिवासी असलेल्या या महिलेचा विवाह भिलवाडा येथील एका 50 वर्षीय अपंग व्यक्तीशी सहा वर्षांपूर्वी झाला होता.