अलाहाबाद : ताजमहालच्या (Taj Mahal)२२ खोल्या उघडण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर (PIL For Opening 22 Rooms Of Taj Mahal) आज अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी झाली.अलाहाबाद उच्च न्यायालयाने यावेळी याचिकाकर्त्यांना चांगलंच सुनावलं. आज तुम्ही ताज महालमधील २२ खोल्या पाहण्यासाठी याचिका दाखल केली आहे. उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जाण्याची परवानगी मागाल असे कोर्टाने म्हटले आहे.
[read_also content=”उरणच्या केगाव समुद्रकिनारी सापडले फ्लेअर्स, स्फोटके असल्याच्या संशयाने खळबळ https://www.navarashtra.com/maharashtra/bomb-like-object-found-near-uran-beach-nrsr-279056.html”]
ताज महालमधील २२ खोल्या उघडल्या जाव्यात आणि आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ASI) कडून त्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. या याचिकेवर न्या. डी. के. उपाध्याय आणि न्या. सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. याचिकार्त्यांच्या वकीलांनी सांगितले की, देशातील नागरिकांना ताज महालबाबत सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. आम्ही. ताज महालमध्ये एखादी वस्तू लपवण्यात आली असेल तर त्याची माहिती नागरिकांना द्यायला हवी. ताज महालची जमीन कोणाची आहे, हा आमचा मुद्दा नसून या बंद खोलीत काय आहे, हे जाणून घ्यायचं असल्याचं याचिकाकर्त्याने म्हटले.
उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांनी बाजू मांडताना म्हटले की, या प्रकरणी आग्रामध्ये आधीच खटला दाखल आहे. त्याशिवाय याचिकाकर्त्याच्या अधिकार क्षेत्रात हा भाग येत नाही.
हायकोर्टाने याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले. तुम्ही आधी एमए करा, त्यानंतर नेट परीक्षा उत्तीर्ण करून जेआरएफसाठी पात्र होऊन या विषयावर संशोधन करावे. एखाद्या विद्यापीठाने तुम्हाला संशोधन करण्यापासून रोखल्यास कोर्टात दाद मागावी, असेही खंडपीठाने याचिकाकर्त्याला सुनावले. ताज महाल कोणी बनवला याची माहिती तुम्हाला नाही का, ताज महालचे वय काय, ते कोणी बनवले याची माहिती देण्यासाठी आम्ही येथे बसलो आहोत का, असा सवालही हायकोर्टाने केला. जनहित याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेला हास्यास्पद करू नका, असेही कोर्टाने म्हटले.