प्रवेश नाकारल्याने भाजप नेत्याचा ताजमहल परिसरात गोळीबार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
आग्रा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ताजमहालच्या पश्चिम गेटजवळील पार्किंग परिसरात ‘यलो झोन’मध्ये प्रवेश नाकारल्याने संतप्त झालेल्या भाजप नेत्याने थेट गोळीबार केला आहे. गोळीबारानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. त्याने हवेत तीन गोळ्या झाड्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. पंकज कुमार सिंह असं त्याचं नाव असून तो एलआयसी एजंट आहे. यापूर्वी भाजपमध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदावरही त्याने काम केलं आहे.
सोमवारी सकाळी ९.१५ वाजता इर्टिगा कारमधून आलेल्या पंकज सिंहने केंद्र सरकारचा कर्मचारी असल्याचं सांगत थेट ताजमहलच्या गेटपर्यंत कार नेण्याचा आग्रह धरला. परंतु, सुरक्षा कारणास्तव पोलिसांनी त्याला गेटपासून परत पाठवले. यामुळे संतप्त होऊन त्याने आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत तीन फायर केले. यानंतर कारमधून तो तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आग्रा पोलिसांनी संबंधित कार आणि त्याच्या चालकाचा शोध घेतला. तपासात पंकजने रामबाग येथून दुसरी कार घेतली घेतल्याचं समोर आलं. लखनऊ पोलिसांच्या मदतीने अवघ्या सात तासांत पंकजला मानक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली. त्याच्याजवळून वापरलेली रिव्हॉल्व्हर व तीन गोळ्यांचे रिकामे खोके जप्त करण्यात आले. त्यानंतर त्याला आग्र्यात आणून सखोल चौकशी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत पंकजने हवेत गोळीबार करण्यामागे कोणतेही ठोस कारण दिले नाही. “माझा मन झालं म्हणून गोळीबार केला,” असं म्हणत त्याने अत्यंत बेजबाबदारपणा दाखवला. पोलिसांनी त्याच्यावर शस्त्र अधिनियम, सार्वजनिक शांततेचा भंग आणि शिवीगाळ करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी दुपारी त्याला वैद्यकीय तपासणीनंतर विशेष सीजेएम न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्यची तुरुंगात रवानगी केली.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी वृंदावनचा चालक नंदलाल याच्यावरही आरोप ठेवण्यात आला आहे, तर दुसरा चालक योगेश चौहानविरुद्ध प्राथमिक चौकशीत काहीही दोष आढळला नसल्याने त्याला क्लीन चिट देण्यात आली आहे. दरम्यान, पंकजच्या परवानाधारक शस्त्राचा परवाना रद्द करण्याची शिफारसही आजमगड प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
या सगळ्या गोंधळानंतर सोमवारी संध्याकाळी पंकजची पत्नी व भाऊ ताजगंज पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पंकज मानसिक रुग्ण असल्याचा दावा केला आणि २००३ मध्ये लखनऊमधील नूर मंजिल मानसोपचार रुग्णालयातील उपचाराचे कागदही दाखवले. मात्र सध्या त्याच्यावर कोणताही वैद्यकीय उपचार सुरू नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी या कारणाला फारसे महत्त्व दिले नाही.
ताजमहालसारख्या अतिसंवेदनशील परिसरात अशा प्रकारची घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून, संबंधित प्रकरणात पोलिसांनी तत्काळ आणि परिणामकारक कारवाई केली आहे.