mahatma gandhi idol
नवी दिल्ली – कॅनडातील रिचमंड हिल येथे असलेल्या एका हिंदू मंदिरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. भारताने या घटनेवर चिंता व्यक्त केली असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली आहे.
यॉर्क प्रादेशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योंगे स्ट्रीट आणि गार्डन अव्हेन्यू परिसरातील विष्णू मंदिरात ही मुर्ती होती. हा द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून तपास केला जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
रिचमंड हिलच्या विष्णू मंदिरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विध्वंसामुळे आम्ही व्यथित झालो. या घटनेमुळे कॅनडामधील भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, असे टोरंटोमधील भारतीय दूतावासाने म्हटले.
यॉर्क पोलिसांनी या घटनेचे वर्णन द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून केले आहे. पोलिस प्रवक्ते एमी बौद्रेउ यांनी सांगितले की, काही बदमाशांनी ‘बलात्कारी’ आणि ‘खलिस्तान’ असे शब्द लिहून पुतळ्याची विटंबना केली आहे. यॉर्क पोलिस कोणत्याही स्वरुपात द्वेषपूर्ण गुन्हे सहन करणार नाहीत. वंश, राष्ट्रीयता, वांशिक मूळ, भाषा, रंग, धर्म, वय, लिंग या आधारावर इतरांना त्रास देणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाईल.