भारताची अर्थव्यवस्था म्हणजे ‘डेड इकॉनॉमी’; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचं राहुल गांधींनी का केलं समर्थन?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत आणि रशिया यांच्या अर्थव्यवस्थांना “मृत अर्थव्यवस्था” (Dead Economy) असं म्हणत दोन्ही देशांवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मात्र ट्रम्प यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.
३१ जुलै रोजी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, “ट्रम्प योग्य तेच बोलत आहेत. संपूर्ण जगाला माहिती आहे की भारताची अर्थव्यवस्था सध्या कोलमडलेली आहे, फक्त पंतप्रधानांना आणि अर्थमंत्र्यांना याची कल्पना नाही. मला आनंद आहे की ट्रम्प यांनी एक सत्य बाहेर आणलं आहे. भाजपने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे, आणि हे सर्व अदानी यांना फायदा मिळवून देण्यासाठीच केलं गेलं आहे, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या या विधानामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे. भाजपने या वक्तव्याला राष्ट्रविरोधी म्हटलं आहे, तर काँग्रेस राहुल गांधी यांच्या वक्तव्याचं समर्थन करत ते फक्त वास्तव मांडत असल्याचं म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “Truth Social” वर भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थांवर टीका करताना म्हटलं, “मला काही फरक पडत नाही की भारत रशियासोबत काय करतो. ते दोघं त्यांच्या ‘मृत अर्थव्यवस्था’ना एकत्र येऊन बुडवू शकतात, त्याचं काहीही मला देणं-घेणं नाही. भारताचे टॅरिफ जगात सर्वाधिक आहेत आणि आम्ही त्यांच्या सोबत खूप कमी व्यापार करतो, असं त्यांनी म्हटलं होतं.
ते पुढे म्हणाले, “तसंच, रशिया आणि अमेरिकेमध्ये जवळपास कोणताही व्यापार होत नाही आणि माझीही इच्छा तीच आहे. मी रशियाचे माजी अध्यक्ष मेदवेदेव यांनी त्यांच्या वक्तव्यांबाबत सावधगिरी बाळगावी. ते एका धोकादायक क्षेत्रात पाऊल ठेवत असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.
या वक्तव्यानंतर अनेक भारतीय नेते आणि तज्ज्ञांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली, पण राहुल गांधींचा पाठिंबा अनेकांसाठी धक्कादायक होता. त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवत म्हटलं की भाजपने भारताच्या आर्थिक कणा कमजोर केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, “नोटबंदी, चुकीच्या पद्धतीने लागू केलेला जीएसटी, कोविड काळातली अकार्यक्षमता आणि मग भांडवलदारांना फायदा पोचवणाऱ्या धोरणांमुळे देश अशा परिस्थितीत पोहोचला आहे. बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, महागाई गगनाला भिडली आहे आणि छोटे व्यवसाय उध्वस्त झाले आहेत.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या उत्पादनांवर २५% आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे भारताच्या परराष्ट्र व्यापार धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारची “प्रचाराधिष्ठित परराष्ट्र नीती” देशाच्या व्यापार हिताला धोका पोहोचवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.