
देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे चिंता वाढली आहे. ओडिशा, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओडिशामधील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर गेली आहे, ज्यामुळे शेकडो गावांवर परिणाम झाला असून, सुमारे १४५०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
छत्तीसगडमध्ये पाऊस आणि पूरसदृश परिस्थितीमुळे २६ सप्टेंबर रोजी राज्यभरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस, वादळी पाऊस आणि अचानक येणाऱ्या पुराच्या शक्यतेमुळे संवेदनशील जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षता बाळगण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. शुक्रवारी ओडिशामध्ये झालेल्या पावसामुळे अनेक भागांतील अडचणी वाढल्या. राज्यभरातील किमान ६३ ठिकाणी १०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तीन ठिकाणी ३०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. नबरंगपूरमधील तेंतुलखुंटी येथे सर्वाधिक ३९५ मिमी पावसाची नोंद झाली.
उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
नंदाहंडी येथे ३४४ मिमी, तर कोरापुटमधील बोरिगुमा येथे ३०७.८ मिमी पावसाची नोंद झाली. दक्षिण आणि पश्चिम ओडिशातील सखल आणि भूस्खलनप्रवण भागांतून सुमारे १४५०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवून २०६१ मदत केंद्रांमध्ये नेण्यात आले आहे. जिथे गरजूंना अन्न पुरवले जात आहे. गर्भवती महिलांना सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
८५७ गावे प्रभावित, नद्यांनाही पूर
मुसळधार पावसाचा सर्वाधिक गंभीर परिणाम राज्यातील कोरापुट, मलकानगिरी, गंजम, गजपती, कंधमाल, रायगडा, नबरंगपूर, कालाहंडी, नुवापाडा आणि बोलंगीर या १० जिल्ह्यांमध्ये जाणवला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, राज्यभरातील ८५७ गावांना पावसामुळे झालेल्या घटनांचा फटका बसला असून, १४४७९ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. सर्वाधिक १८९ गावे गजपतीमध्ये, तर ५८ गावांना फटका बसला आहे.
उत्तर प्रदेशातही दिला होता पावसाचा अंदाज
उत्तर प्रदेशात शुक्रवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. हवामान विभागाने १३ जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. २९ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. ५२ जिल्ह्यांमध्ये ताशी ४० ते ६० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही होती. गुरुवार संध्याकाळपर्यंत, प्रयागराजमध्ये २६ मिमी, सुलतानपूरमध्ये २०.८ मिमी, अमेठीमध्ये १९.८ मिमी आणि गोरखपूरमध्ये १४.२ मिमी पावसाची नोंद झाली. बाराबंकी, अयोध्या, गाझीपूर, बलिया, सोनभद्र आणि महाराजगंज येथेही पाऊस झाला.