नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक आजपासून सुरू झाली आहे. ५ ते ७ डिसेंबर या तीन दिवसीय बैठकीत रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करू शकते.
पण, यावेळी आरबीआय मागील वेळेपेक्षा कमी रेपो दर वाढवेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. एमपीसीच्या मागील तीन बैठकांमध्ये प्रत्येक वेळी व्याजदरात ०.५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. यावेळी मध्यवर्ती बँक व्याजदरात ०.२५ ते ०.३५ टक्क्यांनी वाढ करू शकते.
यावेळी रेपो दरात वाढ करण्याबाबत रिझर्व्ह बँकेने मवाळ भूमिका स्वीकारण्याची अनेक कारणे आहेत. देशात महागाई कमी झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. मात्र, देशातील महागाईचा दर अजूनही रिझर्व्ह बँकेच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे. याशिवाय अनेक रेटिंग एजन्सींनी भारताच्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज कमी केला आहे. व्याजदरात वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्थेत आणखी सुस्ती येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.