
दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला
सरासरी दररोज किमान एका शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे. या बपी झालेल्या अवकाळी पावसाने, गारपिटीने आणि अतिवृष्टीने शेतीची पूर्णपणे माती केली. सोयाबीन अतिवृष्टीचा अवकाळी पावसाचा कपाशीला फटका बसला त्यात सोयाबीन कपाशीला मिळणाऱ्या भावाचा कुठेच ताळमेळ बसत नाही. परिणामी आता पुढील हंगामाचे कसे होईल याच विवंचनेत शेतकरी दिसत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अठराविश्व दारिद्रय संपण्याचे नावच घेत नसल्याचे प्रत्येक हंगामात दिसत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीने तब्बल ६ लाख ५५ हजार हेक्टरवरील शेतपिकांची माती केली. यात ५ लाख ३० हजार ७३६ शेतकरी बाधित झाले. यातील बहुतांश शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
आत्महत्येला पात्र-अपात्रतेच निकष सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी नैराश्येत जावून आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात आर्थिक संकटात सापडल्याने अगतिकता येणे, नैराश्य येणे यातूनच शेतकरी आत्महत्या करतो, मात्र त्या आत्महत्येलाही पात्र अपात्रतेचा निकष शासनाकडून लावल्या जातो.
दरम्यान जिल्ह्यात नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम जोरात आहे निवडणुकीच्या धामधुमीत नेता आता घोषणांचा पाऊस पाडेल, अशी आशा होती मात्र जिल्ह्यातील शेतक-यांचे प्रश्न मात्र कायम भागेव राहत आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ओरात सुरू आहे पण अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा आणि तोट्याच्या शेतीने होरपळलेल्या शेतकऱ्यांना अद्याप ठोस दिलासा मिळालेला नाही.
जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे संकट चिघळत असून ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या महिन्यात तब्बल दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली, पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. परिणामी आत्महत्यांचे प्रमाणाने विक्राळ रूप धारण केले.